पोटफुगीवर (डंबा) ने घेतला चिमुकल्याचा बळी

By admin | Published: July 8, 2016 09:03 PM2016-07-08T21:03:18+5:302016-07-08T21:03:18+5:30

कुपोषणामुळे जगाच्या नकाशावर आलेल्या मेळघाटात आजही आदिवासींमध्ये अंधश्रद्धेचा पगडा भारी असल्याचे पुन्हा उघड झाले आहे.

Stomach (Dumba) took the victim of a sparring | पोटफुगीवर (डंबा) ने घेतला चिमुकल्याचा बळी

पोटफुगीवर (डंबा) ने घेतला चिमुकल्याचा बळी

Next


अघोरी पद्धत: मेळघाटातील आदिवासींवर अंधश्रद्धेचा पगडा

नरेंद्र जावरे , अमरावती 
कुपोषणामुळे जगाच्या नकाशावर आलेल्या मेळघाटात आजही आदिवासींमध्ये अंधश्रद्धेचा पगडा भारी असल्याचे पुन्हा उघड झाले आहे. सात महिन्यांच्या चिमुकल्याचे पोट फुगल्याने त्याला आजीने ‘पोटावर’ गरम विळ्याचे चटके (डंबे) दिले, त्यातून त्याला न्युमोनिया झाला. शेवटच्या क्षणी त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्या चिमुकल्याचे प्राण वाचू शकले नाही. हा गंभीर प्रकार बुधवारी चुरणी ग्रामीण रुग्णालयात घडला.
आमीर किरण कास्देकर (७ महिने, रा. जवलगाव) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. आमीर २ जुलै रोजी आजारी पडला होता. पोटावर सूज दिसत असल्याने त्याच्या आजीने त्याला गरम विळ्याचे चटके (डंबे) दिले. पोटफुगीला आदिवासी पोपसा म्हणतात. पोटावर गरम विळ्याचे चटके दिले की आजार बरा होतो, असा त्यांचा गैरसमज आहे. मात्र सात महिन्याच्या चिमुकल्या आमीरला चटके दिल्याने तो तापाने फणफणला. ४ जुलै रोजी रात्रभर आमीर रडत असल्याचे त्याच्या आजीने अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करला सांगितले. दोघींनी ५ जुलै रोजी आमीरच्या आईला दिवसभरात दवाखान्यात येण्याची गळ घातली. सायंकाळी ४ वाजता ती तयार झाली आणि चुरणी ग्रामीण रुग्णालयात त्याला भरती करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी निखील उप्पलवार यांनी त्याचेवर तत्काळ उपचाराला सुरुवात केली.

नवरा कामाला, सासु-सूनेचा अबोला
आमीरचे वडील किरण कास्देकर अमरावती येथे कामावर आहेत तर सून आणि सासुचे पटत नसल्याने दोघींमध्ये अबोला आहे. किरण कास्देकरला दोन मुले असून आमीर केवळ सात महिन्याचा होता.


उपचारादरम्यान मृत्यू
आमीरला डंब्यामुळे न्युमोनिया व सर्दी खोकला झाला. त्याला गंभीर अवस्थेत चुरणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्याचेवर रात्रंदिवस शर्तीचे उपचार करण्यात आले. मात्र बुधवारी रात्री ८ वाजता त्याची प्राणज्योत मालवली.

डंबा पद्धतीचा अघोरी उपचार
मेळघाटात कुठल्याही आजारावर गरम विळ्याचे चटके देवून घरगुती किंवा गावातील भूमका (मांत्रिका) कडे जावून उपचार करण्याची प्रथा आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा हा प्रकार आहे. गतवर्षी सुद्धा असाच प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. त्या चिमुकल्यावर अमरावतीनंतर नागपूर येथे उपचार करण्यात आले होते. आज तो बालक सृदृढ आहे.


‘आमीरला त्याच्या आजीने आठ दिवसांपूर्वी डंबे दिले होते. त्यातून त्याच्या शरिरात इन्फेक्शन होवून ताप व सोबत सर्दी खोकला झाल्याने न्युमोनिया झाला. महत्प्रयासाने रुग्णालयात आणून त्याचेवर उपचार केले. मात्र तो चिमुकला दगावला.
- निखील उप्पलवार
वैद्यकीय अधिकारी
ग्रामीण रुग्णालय, चुरणी


मेळघाटातील आदिवासी बांधवात मोठया प्रमाणात डंबा पद्धतीचा वापर होतो. शासनाने जनजागृतीसाठी ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे. स्वयंसेवी संस्थांच्या भरवशावर राहणे योग्य नाही. इतक्या वर्षात स्वयंसेवी संस्थांनी कुठले कार्य केले, याचा तपशील पुढे येणे गरजेचे आहे.
- पीयूष मालवीय
सामाजिक कार्यकर्ता, काटकुंभ.

Web Title: Stomach (Dumba) took the victim of a sparring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.