पोटात कपडा विसरणे डॉक्टरांना पडले महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2017 12:58 AM2017-05-20T00:58:31+5:302017-05-20T00:58:31+5:30
सिझेरियन शस्त्रक्रिया करताना महिलेच्या पोटात कपडा विसरणे दोन डॉक्टरांना चांगलेच महागात पडले. उपलब्ध पुराव्यांवरून वैद्यकीय निष्काळजीपणा झाल्याचे सिद्ध
- लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिझेरियन शस्त्रक्रिया करताना महिलेच्या पोटात कपडा विसरणे दोन डॉक्टरांना चांगलेच महागात पडले. उपलब्ध पुराव्यांवरून वैद्यकीय निष्काळजीपणा झाल्याचे सिद्ध झाल्यामुळे राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठाने पीडित महिला व तिचे वडील यांना मिळून सात लाख रुपये भरपाई, त्यावर नऊ टक्केदराने व्याज आणि प्रत्येकी २५ हजार रुपये दावा खर्च देण्याचा आदेश डॉक्टरांना दिला.
खंडपीठाचे अध्यक्ष बी. ए. शेख व सदस्य एस. बी. सावरकर यांनी हे प्रकरण निकाली काढले. संबंधित डॉक्टरांनी पीडित महिलेला संयुक्तपणे किंवा स्वतंत्रपणे पाच लाख रुपये, तर तिच्या वडिलांना संयुक्तपणे किंवा स्वतंत्रपणे दोन लाख रुपये भरपाई द्यावी. या रकमेवर १५ फेब्रुवारी २००० ते प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंतच्या कालावधीत दोघांनाही नऊ टक्के दराने व्याज द्यावे. पीडित महिला व तिच्या वडिलाला प्रत्येकी २५ हजार रुपये दावा खर्चही द्यावा असे आदेश आयोगाने डॉक्टरांना दिले आहेत.
डॉ. शील लढ्ढा व डॉ. नीलेश तिबडीवाल अशी संबंधित डॉक्टरांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध पीडित रचना अग्रवाल व तिचे वडील प्रकाश अग्रवाल यांनी तक्रार दाखल केली होती. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रचना यांना गर्भधारणेची क्षमता गमवावी लागली आहे. जानेवारी-२०००मध्ये सात महिन्यांचा गर्भ असताना त्यांनी डॉ. लढ्ढा यांच्याकडे नियमित उपचार सुरू केले होते. १५ फेब्रुवारी २००० रोजी रचना यांच्या पोटात वेदना सुरू झाल्यानंतर डॉ. लढ्ढा यांनी सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
सहकार्यासाठी डॉ. तिबडीवाल यांना बोलावण्यात आले होते. रचना यांनी मुलीला जन्म दिला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या पोटात वेदना व्हायला लागल्या. काही खाल्ल्यास उलटी व्हायला लागली. डॉ. लढ्ढा व डॉ. तिबडीवाल यांनी वेगवेगळे
उपचार केले, पण काहीच फायदा झाला नाही.
अवयव कापावा लागला
- दोन-तीन महिन्यांपर्यंत आराम झाला नसल्यामुळे दोन्ही डॉक्टर्स काहीतरी लपवीत असल्याचा संशय अग्रवाल कुटुंबीयांना आला. त्यामुळे त्यांनी मुंबई गाठली.
तिथे रचना यांच्यावर २६ मे २००० रोजी शस्त्रक्रिया करून पोटातील कापड बाहेर काढण्यात आले. तसेच, कापडामुळे खराब झालेला एक अवयवही कापावा लागला. हा अवयव गर्भधारणेसाठी आवश्यक होता.