खडकावर फुलली परसबाग
By Admin | Published: April 16, 2017 03:58 PM2017-04-16T15:58:03+5:302017-04-16T15:58:03+5:30
एरंडोल तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या पद्मालय येथे अंगणवाडी सेविकांनी चक्क खडकावर परसबाग फुलवली आहे
बी.एस. चौधरी /ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 16 - एरंडोल तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या पद्मालय येथे अंगणवाडी सेविकांनी चक्क खडकावर परसबाग फुलवली आहे. यामुळे ही परसबाग राज्यस्तरावर झळकली आहे.
या अंगणवाडीतील सेविका सुरेखा सुनील पाटील यांनी पद्मालय येथे स्थानिक आदिवासी नागरिकांच्या मुलांसाठी, तसेच गर्भवती महिलांना सकस पोषण आहार मिळावा म्हणून परसबाग फुलवली. ही परसबाग संपूर्णत: खडकावर माती व शेणखत टाकून तयार करण्यात आली आहे.
यात सेंद्रिय पद्धत वापरण्यात आली आहे. मुलांना पोषक घटक ज्यातून मिळतील, अशा सर्व प्रकारच्या भाज्या लावण्यात आल्या आहेत. फळबाग व फुलांची झाडेसुद्धा लावली आहेत. परसबागेतील भाजीचा वापर मुलांच्या आहारात करण्यात येतो. विशेष हे की, जास्तीचा भाजीपाला तेथील नागरिकांना विकला जातो.
निसर्गरम्य परिसर असलेले गणपतीचे तीर्थक्षेत्र म्हणून आजवर असलेली पद्मालयची ओळख आता या परसबागेमुळे नव्याने नावारुपास येत आहे. यामुळेच ही अंगणवाडी जिल्ह्यावरून पुढे राज्यस्तरापर्यंत पोहोचली आहे. नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्याचा गौरव करण्यात आला.
जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील दुसाने, तत्कालीन प्रकल्पाधिकारी विलास भाटकर, मुख्य सेविका लता पाटील यांचे अंगणवाडी सेविका सुरेखा सुनील पाटील यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. सरपंच परवीन शेख, ग्रा.पं. सदस्य, माजी सरपंच आरिफ शेख, भारती सोनवणे, भगवान सोनवणे, मदतनीस शोभा मोरे, चंदा मोरे, डॉ.सुनील पाटील यांचे सहकार्य लाभले.
ब्रॅण्ड अॅम्बॅसडर म्हणून निवड
राजमाता जिजाऊ माता बालआरोग्य व पोषण मिशन रिलायन्स फाउंडेशन मुंबई व महिला, बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षी परसबाग तयार करण्याचे प्रात्यक्षिक व कार्यशाळा घेण्यात आली. पद्मालय (मूगपाट) सुसंगती अंगणवाडी या परसबागेला राज्यपातळीवर दुसरा, तर जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक देण्यात आला. तसेच रिलायन्स फाउंडेशनने या परसबागेची ब्रॅण्ड अॅम्बॅसडर म्हणून निवड केली आहे.
स्थानिक पालकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने अक्षरश: खडकावर माती टाकली व परसबाग तयार केली. त्यामुळे या परसबागेतून सकस पालेभाज्या व फळभाज्या बालकांना पोषण आहारासाठी उपलब्ध झाल्या. त्यामुळे मूगपाट या आदिवासी वस्तीतील मुले व मुली कुपोषणमुक्त झाले, याचा आनंद आहे.
-सुरेखा पाटील, अंगणवाडी सेविका, पद्मालय, ता. एरंडोल