पोळ्याच्या दिवशी दगडफेक; पोलीसांच्या कारवाईच्या निषेधार्थ कडकडीत बंद
By अनिल गवई | Published: August 29, 2022 11:56 AM2022-08-29T11:56:40+5:302022-08-29T11:57:54+5:30
बैल पोळ्याच्या मिरवणुकीवर झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून एकतर्फी कारवाई झाल्याच्या निषेधार्थ सोमवारी हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारला.
खामगाव:
बैल पोळ्याच्या मिरवणुकीवर झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून एकतर्फी कारवाई झाल्याच्या निषेधार्थ सोमवारी हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारला. शैक्षणिक संस्थांसह किरकोळ विक्रेतेही खामगाव बंदमध्ये सहभागी झाले. सोमवारी मस्तानचौकासह मुख्य रस्त्यावरही शुकशुकाट दिसून आला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच सेवा बंद ठेवण्यात आल्या. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने सकाळी १० वाजता शहरातून कारवाईच्या निषेधार्थ रॅली काढण्यात आली.
पोळ्याच्या दिवशी बैलाच्या छेडखानीतून दोन गटात वाद् उद्भवला होता. या वादातून दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेचा तपास चुकीच्या दिशेने करीत, निरपराधांवर कारवाई केली. ही कारवाई मागे घेण्यात यावी. दगडफेक झाल्याचा कारणाचा शोध घेण्यात यावा. त्याचप्रमाणे घडलेल्या घटनेला जबाबदार असलेल्या तीन पोलीस अधिकाºयांना गणेशोत्सव काळात शहराबाहेर ठेवण्यात यावे, गणशोत्सव काळात जबाबदार आणि चांगल्या अधिकाºयांची खामगावात नियुक्ती करण्यात यावी यासह आदी मागण्यांच्या निषेधार्थ खामगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी १० वाजता शहराच्या विविध भागात हिंदुत्ववादी संघटनांकडून शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी केले. गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांनीही या रॅलीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दगडफेकीच्या कारणांचा शोध घ्यावा!
- पोळ्याच्या दिवशी घडलेल्या दगडफेक प्रकरणी योग्य कारणांचा शोध न घेताच घाई गडबडीने पोलीसांनी कारवाई केली. निरपराध लोकांना अटक केली. वस्तुस्थितीत बैलांची छेड आणि खेळण्यातील नोटा भिरकावनेच घटना घडली. मात्र, मुख्य कारण गुलदस्त्यात ठेवत पोलीसांनी एकतर्फी केल्याचा आरोप खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी केला आहे.
हिंदुत्व संघटनांची रॅली
- पोलीस कारवाईच्या निषेधार्थ गांधी चौकातून रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे खामगाव शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. मोटार सायकल रॅलीद्वारे शहराच्या विविध मार्गावरून मार्गक्रमण करण्यात आले.