संतापाचे दगड पडले बसच्या काचांवर; राज्यात आरक्षण आंदोलन पेटले, मराठा समाज संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 11:41 AM2023-10-30T11:41:55+5:302023-10-30T11:42:15+5:30
नेत्यांना गावात बंदी | जालना, बीड, धाराशिव जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक, पैठणमध्ये बसपूजन | मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ राज्यभरात मराठा समाज एकवटला
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये (जि. जालना) सुरू असलेल्या उपोषणाचा रविवारी पाचवा दिवस होता. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात तीव्र स्वरूपाची आंदोलने सुरू आहेत. आत्महत्यांचे सत्रही सुरूच असून रविवारी चार जणांनी आत्महत्या केल्या आहेत. तर, आंदोलनकर्त्यांकडून काही ठिकाणी हिंसक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही ठिकाणी बसवर दगडफेकही झाली आहे. बसवरील सरकारी जाहिरातींना काळे फासणे, नेत्यांना गावबंदी करणे, शोले स्टाइल आंदोलन, प्रतीकात्मक अंत्ययात्रा अशा आंदोलनांनी दिवसभरात लक्ष वेधले.
तहसीलदारांचे वाहन, बसच्या काचा फोडल्या
जालना तालुक्यातील रामनगर येथे तहसीलदारांनी आंदोलनस्थळी भेट न दिल्याने समाजबांधवांनी त्यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या. एक ते दोन बसवरही दगडफेक केली. धाराशिव शहराजवळील सूतमिल व ढोकी येथे दोन बसवर दगडफेक झाली. चऱ्हाटा (ता. बीड) परिसरात कल्याण-बीड बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. त्यानंतर पुन्हा बससेवा बंद करण्यात आली. धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
कँडल मोर्चा, मशाल फेरी अन् साखळी उपोषण
- कोल्हापूर : मशाल पेटवून फुंकले रणशिंग, दसरा चौकात साखळी उपोषणास प्रारंभ झाला. आंदोलनात महिलांचा सहभाग अधिक.
- सांगली : अनेक गावांत राजकीय नेत्यांना बंदी, मशाल फेरीसह साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
- सातारा : भुईंज येथे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील येणार होते. मात्र, आक्रमक आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेमुळे दौरा रद्द करावा लागला. उपोषणस्थळी आमदार शशिकांत शिंदे यांनी भेट दिली. यावेळी त्यांना रोषाचा सामना करावा लागला.
- जळगाव : शहरात रविवारी सायंकाळी समाजबांधवांनी कँडल मोर्चा काढून मागण्यांकडे लक्ष वेधले.
- सोलापूर : उत्तर सोलापूरमधील कोंडी, कारंबा, कळमणमध्ये मुंडण आंदोलन.
- अकोला : जिल्ह्यात एकाही मंत्र्याचा राजकीय कार्यक्रम होऊ देणार नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
टॉवरवर चढले, कुठे गाडून घेत आंदोलन
धाराशिवमधील वाल्हा (ता.भूम) येथे तीन तरुणांनी टॉवरवर आंदोलन सुरू केले. तर मेडसिंगा येथे अनेकांनी जमिनीत अर्धे गाडून घेतले. अहमदनगर जिल्ह्यात कळसूबाई शिखरावरील आंदोलकास प्रशासनाने पायथ्याशी आणले. लातूर शहरातील गांधी चौकातील पाण्याच्या टाकीवर चढून महिलांनी आंदोलन केले.
मराठवाड्यात चार युवकांच्या आत्महत्या
जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्यांचे सत्र सुरू असून मराठवाड्यात चार जणांनी आत्महत्या केल्या आहेत.
कुक्कडगाव (ता. अंबड, जि. जालना) येथे शनिवारी रात्री २७ वर्षीय तरुणाने गळफास घेतला. अजय रमेश गायकवाड असे मयताचे नाव आहे. तो आत्महत्येपूर्वी अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी गेला होता. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे.
गोंद्री (ता. औसा, जि. लातूर) येथील शरद वसंत भोसले (वय ३२) या तरुणाने रविवारी गळफास घेतला. जिल्ह्यातील ही तिसरी आत्महत्या आहे. मराठ्यांना आरक्षण मिळत नाही म्हणून आत्महत्या करीत आहे, असा मजकूर शरद भोसले यांनी चिठ्ठीत लिहिला आहे. तिसरी आत्महत्या बीड जिल्ह्यातील आहे. परळी तालुक्यातील गोवर्धन (हि.) येथील गंगाभीषण रामराव मोरे (३३) या तरुणाने रविवारी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
याशिवाय परभणी जिल्ह्यातील बोर्डी (ता. जिंतूर) येथे एका ३९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बापूराव उत्तमराव मुळे (३९) असे मयताचे नाव आहे. त्यांनी अंतरवाली सराटी येथील सभेलाही उपस्थिती लावली होती.
कुठेही नेते, मंत्र्यांनी कार्यक्रम घेऊ नये
नाशिक : जिल्हा न्यायालयासमोर शिवतीर्थावर अखंडितपणे ४६ दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाचे रूपांतर रविवारी आमरण उपोषणात झाले आहे. नाना बच्छाव आमरण उपोषणास बसले आहेत. यावेळी आवाहन केले आहे की, कुठेही नेत्यांनी, मंत्र्याने कार्यक्रम घेऊ नये. येथील सार्वजनिक वाचनालयातर्फे येत्या मंगळवारी आयोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या अहमदनगरमधील कार्यक्रमस्थळी जाऊन मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून फ्लेक्स फाडण्यात आला.
मंत्र्यांच्या फोटोला फासले काळे
- हिंगोली : बसेसवरील सरकारी जाहिरातींमधील नेत्यांच्या फोटोवर काळे फासले.
- नांदेड : शेकडो गावांमध्ये नेत्यांना गावबंदी, आमदार, खासदारांची नावे पुसण्याचा उपक्रम सुरू आहे.
- लातूर : सरकारी माहिती फलकावरील मंत्र्यांच्या फोटोला काळे फासण्यात आले आहे.
- बीड : मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गेवराईतील मुस्लीम बांधव अंतरवाली सराटीकडे.
- परभणी : पूर्णा येथे नेत्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले, झरी गावात बसेसवरील सरकारी जाहिरातींना काळे फासले.
आत्महत्या थांबवा
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. या घटनांमुळे मी व्यथित झालो आहे. आत्महत्यांचा आकडा वाढत आहे. याबाबत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी चिंता व्यक्त केली.
पप्पा घरी यायला पाहिजे
सरकारला उपोषणाशिवाय जाग येत नाही का? आरक्षण पाहिजेच. माझे पप्पा पण घरी यायला पाहिजेत. तुमच्या घरातली व्यक्ती अशा अवस्थेत असता, तुम्ही काय केलं असतं?
-मनोज जरांगे यांच्या मुली पल्लवी-प्रणालीचा सवाल