नंदुरबारमध्ये दगडफेक, जाळपोळ
By admin | Published: June 11, 2017 12:57 AM2017-06-11T00:57:26+5:302017-06-11T00:57:26+5:30
गेल्या आठवड्यात झालेल्या मारहाणीतील जखमीचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. त्याचे पडसाद नंदुरबारात सकाळी उमटले. शास्त्रीमार्केट परिसरात दगडफेक सुरू झाली.
- लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या आठवड्यात झालेल्या मारहाणीतील जखमीचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. त्याचे पडसाद नंदुरबारात सकाळी उमटले. शास्त्रीमार्केट परिसरात दगडफेक सुरू झाली. त्याचे लोण शहरातील इतरही भागात पसरले आणि अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. घरे व वाहनांची तोडफोड करण्यात आली. दगडफेकीत सहा पोलीस कर्मचारी व अधिकारी देखील जखमी झाले. दंगेखोरांना आवरण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नऊ नळकांड्या फोडल्या.
गेल्या आठवड्यात शास्त्री मार्केट परिसरातील खाद्यपदार्थाच्या लॉरीवर किरकोळ वादातून मारहाण झाली होती. त्यातील एका जखमीचा उपचारादरम्यान शनिवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे सकाळी आठपासूनच तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मंगळबाजार, शास्त्रीमार्केट, स्टेशनरोड, गणपतीमंदीर, सोनारखुंट परिसरातील दुकाने सकाळी उघडलीच नाही. मृताच्या घराच्या परिसरात नातेवाईक जमले होते तर इतर भागात धुसफूस वाढतच होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठिकठिकाणी वाढीव बंदोबस्त तैनात केला होता.
सोनारखुंट परिसरात एका गटातील जमावाने अनेक घरी लुटली. दुकानातील वस्तू घेवून जमाव लुटमार करीत होता. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त कमी असल्यामुळे जमावावर नियंत्रण आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. पोलीस मुख्यालय, तसेच जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यामधून अधिकचा पोलीस बंदोबस्त आल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.