दलितांवरील अत्याचार थांबवा
By admin | Published: July 12, 2017 04:31 AM2017-07-12T04:31:41+5:302017-07-12T04:31:41+5:30
देशात काही ठिकाणी दलितांवर अत्याचार होत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा (जि. नंदुरबार) : देशात काही ठिकाणी दलितांवर अत्याचार होत आहेत. ते थांबविले पाहिजेत. अन्याय करणाऱ्यांना सर्वांनी एकत्र येऊन सामूहिक शिक्षा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी येथे केले.
शहादा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण आठवले यांच्या हस्ते झाले़ त्यावेळी ते बोलत होते. आठवले म्हणाले की, डॉ. आंबेडकर हे दलितांचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नेते होते. आज त्यांनी दाखविलेल्या मार्गाची व विचारांची खरी गरज आहे. समाजात आज परिवर्तन होत आहे. काही ठिकाणी दलितांवर अत्याचार झाले ते थांबविले पाहिजेत. देशात शांतता नांदावी यासाठी बाबासाहेबांच्या विचारांची गरज आहे. आपल्या देशाचे संविधान बलवान असून ते बदलण्याचे सामर्थ्य कोणातही नाही. संविधानात नागरिकांचे भाग्य बदलण्याची ताकद आहे. जो कोणी देश तोडण्याची भाषा करेल त्याला जनताच धडा शिकवेल, असेही आठवले म्हणाले.