बेकायदा धंद्यांसह भ्रष्टाचार थांबवाच
By admin | Published: April 5, 2016 01:06 AM2016-04-05T01:06:49+5:302016-04-05T01:06:49+5:30
पोलिसांमधील भ्रष्टाचार आणि बेकायदा धंदे पूर्णपणे बंद म्हणजे बंद. याबाबतीतला हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम नवनियुक्त पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला
पुणे : पोलिसांमधील भ्रष्टाचार आणि बेकायदा धंदे पूर्णपणे बंद म्हणजे बंद. याबाबतीतला हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम नवनियुक्त पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सोमवारी पहिल्याच बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना भरला. ज्या पोलीस ठाण्यामध्ये भ्रष्टाचार आणि हद्दीमध्ये बेकायदा धंदे आढळून येतील त्याला सर्वस्वी प्रभारी निरीक्षक जबाबदार असतील असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
पोलीस आयुक्तालयामध्ये सोमवारी शहरातील सर्वच पोलीस अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त आयुक्त सी. एच. वाकडे, सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक उपस्थित होते. पोलीस आयुक्तांनी शहरातील संघटित गुन्हेगारीचा आढावा घेतला. शहरातील गुन्हेगारीची, वाहतूक शाखा, विशेष शाखेच्या उपायुक्तांकडून त्यांच्या शाखेमार्फत चालणाऱ्या कामाची माहिती करून घेतली. दरम्यान, त्यांनी सर्वांना सूचनाही केल्या. यासोबतच गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सी. एच. वाकडे यांनी गुन्हे शाखेची माहिती दिली.
सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवून गुन्हेगारी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा. ‘बॉडी आॅफेन्सेस’ कमी करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत. पुणे शहराचे ‘पोलिसिंग’ सुधारण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यास सांगतानाच पोलीस ठाण्यात आणि चौक्यांमध्ये आलेल्या नागरिकांना सौजन्याची वागणूक द्या असेही त्यांनी बजावले. तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांच्या तक्रारी तात्काळ दाखल करून घ्या. त्यांच्याशी संवाद साधा. पोलीस ठाणे त्यांना आपलेसे वाटेल अशी वर्तणूक ठेवा असेही त्यांनी सांगितले. वाहतूक पोलिसांनी सकाळी आणि संध्याकाळच्या घाईगडबडीच्या वेळेत ‘पावत्या’ फाडण्यात वेळ घालवू नये. सकाळी आणि संध्याकाळी नागरिकांना कामावर जाण्याची तसेच घराकडे परतण्याची घाई असते. अशा वेळेस रस्त्यावर वाहनांची संख्या अधिक असते. चौकातील पोलीस पावत्या फाडण्यात दंग असल्यामुळे कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे दंड वसुलीपेक्षा वाहतूक नियमनावर अधिक भर द्यावा अशा सूचना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केल्या.