इमानसाठीचे ‘क्राउड फंडिंग’ कॅम्पेन थांबविले
By admin | Published: April 27, 2017 12:17 AM2017-04-27T00:17:39+5:302017-04-27T00:17:39+5:30
जगातील सर्वांत लठ्ठ अशी ओळख असणाऱ्या इजिप्तच्या इमान अहमदचे वजन आता ५००हून १७१ वर आले आहे. मात्र, १४ एप्रिल रोजी
मुंबई : जगातील सर्वांत लठ्ठ अशी ओळख असणाऱ्या इजिप्तच्या इमान अहमदचे वजन आता ५००हून १७१ वर आले आहे. मात्र, १४ एप्रिल रोजी इमानची बहीण शायमा यांनी डॉ. मुफ्फझल लकडावाला यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले. आता इमानवरील उपचारांच्या वाद-प्रतिवादानंतर तिच्यासाठी इंटरनेटवर सुरू करण्यात आलेले क्राउड फंडिंग कॅम्पेन थांबविण्यात आले आहे. मुंबईनंतर आता पुढील उपचारांसाठी इमान अबुधाबीला रवाना होण्याची शक्यता आहे.
‘सेव्ह इमान’ या शीषकांतर्गत सुरू करण्यात आलेले क्राउड फंडिंग कॅम्पेन १९ एप्रिल रोजी थांबविण्यात आले. या कॅम्पेनच्या माध्यमातून २१ लाख १४ हजार २१७ एवढा निधी उभा करण्यात आला. या कॅम्पेनला जगभरातील २०८ व्यक्तींनी पाठिंबा दर्शवला होता. मंगळवारी इमानचे सिटीस्कॅन करण्यात आले. त्यानंतर, आता त्याच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे.
मुंबईतील उपचारांनतर आता भविष्यातील उपचारांसाठी इमान अबुधाबीला जाण्याची शक्यता आहे. यासाठी अबुधाबी येथील ‘व्हीपीएस हेल्थकेअर’च्या डॉक्टरांनी बुधवारी सैफी रुग्णालयातील डॉक्टरांशी इमानच्या तब्येतीविषयी चर्चा केली. इमानची बहीण शायमा यांनी सांगितले की, अबुधाबी येथील ‘व्हीपीएस हेल्थकेअर’चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक शमशीर वायलिल यांनी यापूर्वी इमानच्या उपचारांसाठी संपर्क साधला होता. याविषयी, सैफी रुग्णालयाच्या डॉ.अर्पणा भास्कर यांनी सांगितले की, इमानच्या वैद्यकीय स्थितीची संपूर्ण माहिती व्हीपीएसच्या चमूला देण्यात येईल. शिवाय त्यानंतर इमानची भेटसुद्धा घडविण्यात येईल. (प्रतिनिधी)