दुष्काळी टुरिझम थांबवा!
By admin | Published: September 5, 2015 01:33 AM2015-09-05T01:33:29+5:302015-09-05T01:33:29+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दुष्काळी भागात सुरू केलेले दौरे म्हणजे केवळ ‘दुष्काळी टुरिझम’ असून, हे दौरे थांबवून दुष्काळी
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दुष्काळी भागात सुरू केलेले दौरे म्हणजे केवळ ‘दुष्काळी टुरिझम’ असून, हे दौरे थांबवून दुष्काळी भागातील लोकांना सर्वप्रथम आवश्यक मदत व सुविधा द्या, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी काहीच केले नसल्याने त्यांना दौरे आणि आंदोलने करण्याचा अधिकारच नाही, असेही राज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सत्ताधिकाऱ्यांची अजूनही मंत्रालयात व्यवस्थित मांड बसलेली नाही. त्यामुळे घोषणा खूप होतात, परंतु अंमलबजावणी होते किंवा नाही याकडे बघितले जात नाही, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याविषयी बोलताना लोकांशी बोलण्यापेक्षा त्यांनी हवी असलेली कामे तातडीने करा. जनावरांचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, तो सोडावा. लोकांना तातडीने हवे आहे ते करा.
गेली १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात सत्तेत होता. १५ वर्षे हा छोटा कालावधी नाही़ त्यात जर राष्ट्रवादीने शेतकऱ्यांसाठी खरोखरच काम केले असते तर आज राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती राहिली नसती, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)