गटबाजी थांबवा, शिस्त पाळा
By admin | Published: January 26, 2017 02:34 AM2017-01-26T02:34:01+5:302017-01-26T02:34:01+5:30
प्रत्येक निवडणुकीत उफाळून येणाऱ्या मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीची काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने गंभीर दखल घेतली आहे.
गौरीशंकर घाळे, मुंबई
प्रत्येक निवडणुकीत उफाळून येणाऱ्या मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीची काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने गंभीर दखल घेतली आहे. पक्षाच्या धोरणानुसार कामकाज करतानाच गटबाजीची जाहीर चर्चा रोखण्याचे निर्देश पक्ष नेतृत्वाने दिले आहेत. एकीकडे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा सल्ला देतानाच, वाद पक्षाच्या व्यासपीठावरच सोडविण्याची समज गुरुदास कामत गटाला देण्यात आल्याचे समजते.
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पुन्हा एकदा पक्षांतर्गत संघर्ष पेटल्याने वादावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपिंदर सिंग हुड्डा मुंबईत दाखल झाले. बुधवारी हुड्डा यांच्या उपस्थितीत गरवारे क्लबमध्ये काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली. या वेळी संजय निरुपम यांच्यासह प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश, माजी खासदार मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड, प्रिया दत्त, आमदार वर्षा गायकवाड, भाई जगताप, चरणसिंग सप्रा, जनार्दन चांदूरकर, माजी आमदार कृपाशंकर सिंह आदी प्रमुख नेत्यांसह मुंबईतील काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे, ज्यांच्या मेसेजमुळे वादाची ठिणगी पडली, ते गुरुदास कामत मात्र, बैठकीला अनुपस्थित राहिले.
गुरुदास कामत यांच्याकडे राजस्थानचे प्रभारीपद असल्याने ते तिकडे गेल्याचे कारण काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवड प्रक्रियेबाबत भूपिंदर हुड्डा यांनी माहिती घेतल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. या वेळी मुंबई काँग्रेसमधील विविध नेत्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखविली. पक्षाच्या कार्यक्रमांच्या नियोजनात विश्वास घेतले जात नसल्याबद्दलही काही नेत्यांनी आक्षेप नोंदविला. हुड्डा यांनी सर्वांचे बोलणे ऐकून घेतले. मात्र, पक्षांतर्गत वाद माध्यमातून चघळल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील वाद चव्हाट्यावर आल्याने पक्षाचे नुकसान होते. प्रत्येकाने पक्षाच्या ध्येयधोरणाप्रमाणे काम करायला हवे. अंतर्गत वाद मिटवून निवडणुकीसाठी सज्ज होण्याच्या सूचना हुड्डा यांनी दिल्या.
या वेळी अन्य नेत्यांनी पक्षातील वादाबाबत जाहीर मतप्रदर्शन करण्यात येत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. कामत गटाकडून वारंवार अडवणुकीची भूमिका घेतली जाते. कोणत्याही नेत्याला काम करू दिले जात नसल्याची भावनाही काही नेत्यांनी व्यक्त केली.
२१ फेब्रुवारीनंतरच बोलणार - निरुपम
पक्षातील अंतर्गत गटबाजीबाबत २१ फेब्रुवारीनंतरच बोलणार असल्याचे संजय निरुपम यांनी सांगितले. बुधवारच्या बैठकीत उमेदवार निवडप्रक्रिया आणि त्यातील सुधारणांबाबत चर्चा झाल्याचे ते म्हणाले. अंतर्गत वाद आम्ही एकत्र येऊन सोडवू. आता आमचा लढा शिवसेना, भाजपाशी आहे. महापालिकेत सत्ताबदल करणे हेच आमचे लक्ष्य असल्याचे निरुपम यांनी स्पष्ट केले.
कोअर कमिटीच्या बैठकीपूर्वी हुड्डा यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसोबत संवाद साधला. या वेळी मुंबई काँग्रेसमधील कारभारात सुधारणा करण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते.
मनमानी पद्धतीने पक्षाचा कारभार चालविता येणार नाही. सर्वांना सोबत घेऊन काम करायला हवे. अध्यक्षपद आले, याचा अर्थ अन्य नेत्यांना बाजूला सारले असा होत नाही. तेही ज्येष्ठ नेते आहेत, पक्षासाठी त्यांचे योगदानही महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन पक्ष चालविण्याची भूमिका स्वीकारायला हवी, अशी समज हुड्डा यांनी दिली.