देशभक्तीची पोपटपंची बंद करा ! उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांवर बरसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2017 07:58 AM2017-01-06T07:58:47+5:302017-01-06T07:58:47+5:30

नोटाबंदीमुळे रस्त्यावर विवस्त्र होण्याची वेळ आलेल्या त्या महिलेसाठी तरी सहानुभूतीचे दोन शब्द बोला, नसेल तर देशभक्तीची पोपटपंची बंद करा असं उद्धव ठाकरे बोलले आहेत

Stop patriotism! Uddhav Thackeray has lived on the Chief Minister | देशभक्तीची पोपटपंची बंद करा ! उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांवर बरसले

देशभक्तीची पोपटपंची बंद करा ! उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांवर बरसले

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एका नोटाबंदीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. नोटाबंदीमुळे सामान्य जनता व गृहिणींच्या बचतीची रद्दी झाली आहे आणि गरीबांच्या नोकर्‍या, रोजगार जात असल्याने त्यांच्या पोटातील भुकेने नवे अराजक केव्हाही निर्माण होऊ शकते. खरे तर याच भीतीने आमच्यासारख्यांच्या पोटात भीतीचा गोळा येत आहे, पण तुमच्या पोटात गोळा का येत नाही? छातीत कळ का येत नाही? ही दारूण अवस्था पाहून आमचे पोट दुखते, तुमचे का दुखत नाही? असे उपरोधिक सवाल उद्धव ठाकरेंनी विचारले आहेत. 
 
तुम्ही स्वत:ला जनतेचे हितकर्ते म्हणवून घेता ना, मग सर्वात आधी ही कळ तुमच्या पोटात यायला हवी. आता किमान नोटाबंदीमुळे रस्त्यावर विवस्त्र होण्याची वेळ आलेल्या त्या महिलेसाठी तरी सहानुभूतीचे दोन शब्द बोला. ते जमणार नसेल तर देशभक्तीची पोपटपंची बंद करा! असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे राजकारणातील एक निष्पाप आणि निरागस व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या गोंडस चेहर्‍याकडे पाहून तरी तसाच भास होतो. अधूनमधून ते काही शब्दकोडी टाकत असतात. आज आम्हीही त्यांना एक कोडे टाकणार आहोत असा स्तुतीवजा टोला उद्धव ठाकरेंनी हाणला आहे. 
 
संतापलेल्या एका गरीब महिलेने रिझर्व्ह बँकेच्या दारातच अंगावरील कपडे काढण्यास सुरुवात केली. पंतप्रधानांपर्यंत हा नोटाबंदी अत्याचार पोहोचावा म्हणून ती रिझर्व्ह बँकेसमोर निर्वस्त्र झाली व ओक्साबोक्शी रडू लागली. आमचे मुख्यमंत्र्यांना असे कोडे आहे की, आता तुम्ही सांगा, तुम्ही नक्की कुणाच्या बाजूने आहात? ‘नोटाबंदी’च्या बाजूने आहात की त्या रस्त्यावर रडणार्‍या, न्याय मागण्यासाठी विवस्त्र झालेल्या सामान्य महिलेच्या बाजूने आहात? असे खडे सवाल उद्धव ठाकरेंनी विचारले आहेत. 
 
ती जी महिला आहे तिचे दु:ख व यातना सरकारला समजले नसेल तर इतके निर्घृण आणि बधिर सरकार गेल्या दहा हजार वर्षांत झाले नसेल अशी संतापजनक टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. एक अबला भररस्त्यावर कपडे उतरवून सरकारचा निषेध करते हेसुद्धा दिल्लीच्या रस्त्यावर घडलेले सरकार पुरस्कृत ‘निर्भयाकांड’ आहे. महिलांचे दबलेले हुंदके व संताप या निर्भयाने रस्त्यावर आणला. ती बाई निर्वस्त्र झाली यालाही आपण देशभक्तीच म्हणणार असाल तर तुमची डोकी तपासायला ‘तालिबानी’ डॉक्टरांनाच बोलवावे लागेल असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
मुख्यमंत्र्यांना माझा सवाल आहे की, तुम्ही नक्की कुणाच्या बाजूने आहात? तुमचे समर्थन भ्रष्टाचाराला आहे की भ्रष्टाचारमुक्तीला? एकदा तुम्ही स्पष्ट करून टाका. काळा पैसावाल्यांच्या नोटांची रद्दी होत असेल तर तुमच्या पोटात का दुखते?’’ मुख्यमंत्र्यांचा निष्पाप सवाल बिनतोड आहे. मात्र आता ‘नोटाबंदी’मुळे विवस्त्र झालेल्या महिलेचा संताप पाहून त्यांच्या पोटातील पाणीही हलले नसेल तर ती त्यांची मजबुरी आहे. भ्रष्टाचारमुक्तीचा डंका पिटून गरीबांना छळणे यास राज्य करणे म्हणत नाही असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 

Web Title: Stop patriotism! Uddhav Thackeray has lived on the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.