"राजकारण थांबवा, सलोखा राखा", नारायण राणे यांचे राजकीय नेत्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 08:01 PM2024-07-16T20:01:29+5:302024-07-16T20:07:05+5:30

Narayan Rane : राज्यातील सर्व जबाबदार नेत्यांनी एकत्र यावं आणि शांतता राखण्याचा प्रयत्न करावा, असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे. 

"Stop Politics, Maintain Reconciliation", Narayan Rane's appeal to political leaders | "राजकारण थांबवा, सलोखा राखा", नारायण राणे यांचे राजकीय नेत्यांना आवाहन

"राजकारण थांबवा, सलोखा राखा", नारायण राणे यांचे राजकीय नेत्यांना आवाहन

मुंबई : राज्यात काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार  नारायण राणे यांनी राज्यातील राजकीय नेत्यांना आवाहन केले आहे.

सध्‍या जाती-जातींमध्‍ये द्वेषाचे विष कालवून जातीय सलोखा धोक्‍यात आणण्‍याचे प्रयत्‍न सुरु आहेत. मात्र त्यामध्ये सर्वसामान्यांचा बळी जात आहे. त्यामुळे राजकारण थांबवा आणि जातीय सलोखा राखा, असे आवाहन नारायण राणे यांनी केले आहे. तसेच, राज्यातील सर्व जबाबदार नेत्यांनी एकत्र यावं आणि शांतता राखण्याचा प्रयत्न करावा, असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे. 

यासंदर्भात नारायण राणे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. नारायण राणे यांची पोस्ट जशास तशी वाचा....

राजकारण थांबवा!  सलोखा राखा! 
छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या शिवकल्‍याणकारी महाराष्‍ट्रामध्‍ये सध्‍या जाती-जातींमध्‍ये द्वेषाचे विष कालवून जातीय सलोखा धोक्‍यात आणण्‍याचे प्रयत्‍न सुरु आहेत. विविध विचारसरणीचे आणि त्‍यातही नव्‍याने पुढे आलेले काही नेते किरकोळ राजकीय फायदा नजरेसमोर ठेऊन दुहीचे आणि द्वेषाचे विष कालविण्‍याचे पाप करीत आहेत. सर्वसामान्‍यांच्‍या हितासाठी जाती-जातींमध्‍ये संघर्ष निर्माण करीत असल्‍याची बतावणी ही मंडळी करतात. संघर्षामध्‍ये शेवटी सर्वसामान्‍यांचे बळी जातात व नुकसान होते हे मात्र ते विसरतात. 
छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या महाराष्‍ट्रामध्‍ये ऐतिहासिक काळापासून जातीय सलोख्‍याचे वातावरण आहे आणि गावा-गावांमध्‍ये लोक गुण्‍यागोविंद्याने नांदतात. या वातावरणाला नख लावण्‍याचे प्रयत्‍न हाणून पाडले पाहिजेत. सर्व जबाबबदार राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन महाराष्‍ट्रातील जातीय सलोखा कायम रहावा यासाठी प्रयत्‍न करावेत असे मला वाटते.

दरम्यान, राज्यात काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. काही राजकीय नेत्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील धार्मिक आणि जातीय सलोखा बिघडत असल्याचं चित्र आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. 
 
दुसरीकडे, मनोज जरांगे यांनी केलेल्या मागणीला ओबीसींचा विरोध आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत ठोस काहीही निर्णय झाला नाही. यातच आता राज्यात एसी, एसटी आणि ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी यांनी दिली आहे.

Web Title: "Stop Politics, Maintain Reconciliation", Narayan Rane's appeal to political leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.