काँग्रेसचे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
By admin | Published: August 12, 2016 02:19 AM2016-08-12T02:19:27+5:302016-08-12T02:19:27+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. काँग्रेसच्या वतीने महामार्गावर हमरापूर फाटा येथे जिल्हा परिषदेच्या सदस्या कौसल्या पाटील
वडखळ/पेण : मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. काँग्रेसच्या वतीने महामार्गावर हमरापूर फाटा येथे जिल्हा परिषदेच्या सदस्या कौसल्या पाटील, माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
महामार्गावर पळस्पे ते इंदापूर दरम्यान विशेषत: खारपाडा ते वडखळ पर्यंत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून रस्त्याची पूर्णत: दैना झाली आहे. तसेच हमरापूर फाटा ते सोनखार, दादर व कोपर फाटा ते कोपर या रस्त्यावर देखील जागोजागी खड्डे पडले आहेत. याविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबई-गोवा महामार्गावर हमरापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यात जि. प. सदस्या कौसल्या पाटील, माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, युवा नेते ललित पाटील, अॅड. प्रशांत पाटील, प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस नंदा म्हात्रे, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष अविनाश पाटील, यशवंत घासे, माजी अध्यक्ष अनंत पाटील, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष हितेश पाटील, महिला अध्यक्षा पूजा मोकल, पंचायत समिती सदस्या लक्ष्मी पाटील यांच्यासह विभागातील सरपंच, सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वैकुंठ पाटील म्हणाले की, आज हमरापूर-दादर रस्ता तसेच महामार्गावर शेकडो खड्डे पडले आहेत, परंतु स्थानिक आमदार काहीही करत नाहीत. फक्त निवडणुकीच्या काळात येतात, नंतर गायब होतात असे सांगितले. येथून ये-जा करताना प्रवाशांना त्रास सहन करावा लगत आहे. त्यामुळेच हे आंदोलन करत आहोत, प्रसिद्धी मिळवण्यासाठी नाही असे सांगून जर का येत्या आठ दिवसांत सर्व खड्डे भरले गेले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी कौसल्या पाटील, अनंत पाटील, अविनाश पाटील, मच्छिंद्र पाटील, शिवाजी पाटील आदींनीही खड्ड्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीचे अधिकारी विनित गोवेकर यांनी येत्या २५ आॅगस्टपर्यंत महामार्गावरील सर्व खड्डे भरले जातील असे लेखी आश्वासन शिष्टमंडळाला दिले. तसेच हमरापूर-दादर रस्त्यावरील खड्डे देखील भरले जातील असे बांधकाम खात्याचे अधिकारी करपे यांनी सांगितले. पोलीस उपअधीक्षक जयसिंग तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.