दौंडच्या पूर्व भागात पाणी सोडण्यासाठी ‘रास्ता रोको’
By admin | Published: April 29, 2016 01:51 AM2016-04-29T01:51:04+5:302016-04-29T01:51:04+5:30
रमेश शितोळे यांच्या नेतृत्वाखाली शनिवार (दि.३०) रोजी राजेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा तहसीलदार उत्तम दिघे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
राजेगाव : भामा-आसखेड धरणातून सोडण्यात आलेले पाणी दौंड तालुक्याच्या पूर्व भागात नाही सोडले, तर रमेश शितोळे यांच्या नेतृत्वाखाली शनिवार (दि.३०) रोजी राजेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा तहसीलदार उत्तम दिघे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
एक महिना उलटून गेला, तरी भामा आसखेड धरणातून सोडलेले पाणी खानवटे गावापर्यंत पोहोचले नाही. पाटेठाण, वडगाव बांडे, आलेगाव पागा, सादलगाव, पारगाव आणि कानगाव या गावांतील बंधाऱ्यात पावसाळ्यात पुरेल एवढा पाणीसाठा आहे. दीड महिना पुरेल एवढा पाणीसाठा बंधाऱ्यात ठेवून राहिलेले पाणी पूर्व भागासाठी सोडावे. वरील भागातील बंधाऱ्याचे ढापे पोलीस बंदोबस्तात काढून पाणी सोडावे. पाणी पोहोचेपर्यंत या भागातील नदीवरील वीज पंपाचा विद्युत पुरवठा बंद ठेवावा.
पूर्व भागातील नदीपात्रात पाण्याचा थेंबही शिल्लक नाही. नदीपात्र पूर्णपणे कोरडे पडले आहे. त्यामुळे पूर्व भागातील शेतकरीवर्गाची अवस्था दयनीय झाली आहे. उभी पिके जळून खाक झाली आहेत. जनावरांना व माणसांना पाणी पिण्यासाठी वरील बंधाऱ्याचे ढापे खोलून पाणी सोडावे, यासाठी शनिवार (दि.३०) रोजी सकाळी १० वाजता राजेगाव येथे पूर्व भागातील शेतकरी सामाजिक कार्यकर्ते रमेश शितोळे यांच्या नेतृत्वाखाली दौंड-भिगवण रस्त्यावर राजेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. शनिवारपर्यंत पाणी नाही सोडले, तर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती रमेश शितोळे यांनी दिली.