'ऑनलाईन औषध विक्री बंद करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 01:53 AM2018-12-15T01:53:33+5:302018-12-15T01:54:02+5:30

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अन्न व औषध प्रशासनाकडे कार्यवाहीची विक्रेत्यांची मागणी

'Stop selling online pharmacy' | 'ऑनलाईन औषध विक्री बंद करा'

'ऑनलाईन औषध विक्री बंद करा'

googlenewsNext

पुणे : औषधांची ऑनलाईन विक्री बंद करण्याचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. या आदेशाचे औषध विक्रेत्यांच्या संघटनेने स्वागत केले आहे. याबाबत आता अन्न व औषध प्रशासनाकडे ऑनलाईन औषध विक्री बंद करण्याची कार्यवाही सुरू करण्याची मागणी करणार असल्याचे पुणे जिल्हा औषधविक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुशील शहा यांनी सांगितले.

आॅनलाईन औषध विक्रीला विरोध दर्शविणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने नुकतीच ही औषध विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच याबाबत योग्य पावले उचलण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहे. आॅनलाईन विक्रीवर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा सध्या अस्तित्वात नाही. काही कंपन्यांकडे आॅनलाईन विक्रीचा परवानाही नाही. तसेच औषधांसाठी आवश्यक वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री होते, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा औषधविक्रेता संघटनेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

संघटनेची आज बैठक
संघटनेची शनिवारी (दि. १५) बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये न्यायालयाच्या आदेशावर चर्चा केली जाईल. तसेच अन्न व औषध प्रशासनाकडे आदेशानुसार विक्री थांबविण्याची मागणी केली जाणार आहे. शहा म्हणाले, की आॅनलाईन औषध विक्री घातक आहे. पुण्यामध्येही काही जण अशी विक्री करीत आहेत. काही औषधांचे तरुणांना व्यसन लागण्याची भीती आहे. आॅनलाईनवर वैध प्रिस्क्रिप्शनची गरज नसल्याने हा धोका आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केली जाईल.

Web Title: 'Stop selling online pharmacy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.