...तर कचरा उचलणे बंद!
By Admin | Published: June 7, 2017 02:38 AM2017-06-07T02:38:04+5:302017-06-07T02:38:04+5:30
मुंबईतील अनेक गृहनिर्माण सोसायट्या आणि वसाहती यांच्याकडून या नियमांचे पालन केले जात नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सुका आणि ओला कचरा वेगळ्या डब्यात ठेवण्याची सक्ती केल्यानंतरही मुंबईतील अनेक गृहनिर्माण सोसायट्या आणि वसाहती यांच्याकडून या नियमांचे पालन केले जात नाही. गेल्या चार महिन्यांत अशा सुमारे ३५ हजार सोसायट्यांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. मात्र संबंधित कारवाईला बहुतांशी सोसायट्या जुमानत नसल्याने कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या सोसायटींचा कचरा उचलणेच बंद करण्याचा महापालिकेचा विचार सुरू आहे.
ओला कचरा आणि सुका कचरा यांचे वर्गीकरण होण्यासाठी २००२ पासून पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान राबविण्यास सुरुवात केल्यानंतर या योजनेला गती मिळाली. दरम्यान, देवनार आणि मुलुंड डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपुष्टात येत असल्यामुळे आणि याबाबत न्यायालयानेही आदेश दिल्याने याची अंमलबजावणी काटेकोरपणे सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार कचरा वर्गीकरण करण्यासाठी सोसायट्यांना नोटीस पाठविण्यात येत आहेत.
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत तब्बल २३ हजार १६१ सोसायट्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, या नोटीसनंतरही सोसायटी आणि वसाहतींकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या सोसायट्यांवर कारवाई करण्याचा पालिकेचा विचार सुरू आहे.
सोसायट्यांना नोटीसची दखल घेण्यास भाग पाडण्यासाठी त्यांचा कचरा उचलायचा नाही, असा पालिकेचा विचार सुरू आहे. कचऱ्याच्या वर्गीकरणाबाबतची अट २० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या बांधकामांच्या ‘आयओडी’मध्ये घालण्यात आली आहे. तर वीस हजार चौरस मीटरहून कमी क्षेत्रफळाच्या सोसायट्यांकडून कचरा वर्गीकरणाची अंमलबजावणी होत नसल्यास नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. कचरा वर्गीकरण करता यावा म्हणून प्रत्येक सोसायटीला २५० लीटरच्या दोन स्वतंत्र कचरापेट्या देण्यात आल्या आहेत. नगरसेवकांच्या वतीने दहा लीटर क्षमतेच्या दोन कचरापेट्या ओला आणि सुका कचरा टाकण्यासाठी वितरित करण्यात आल्या आहेत. याशिवाय मुंबईतील अनेक रस्त्यांवर तसेच रेल्वे स्थानकांवर ओला आणि सुका कचरा टाकण्यासाठी दोन स्वतंत्र कचरापेट्या आहेत.
शहर उपनगरातील सोसायट्यांना नोटीस
वांद्रे, सांताक्रूझ पश्चिम : ५३२८
बोरीवली : ४७७१
प्रभादेवी, वरळी, लोअर परेल : ३३६५
दादर, माहीम, धारावी : २३४५
वांद्रे ते सांताक्रूझ पूर्व : १९७२
पर्यायी डम्पिंगची प्रक्रिया सुरू
मुंबईत प्रतिदिन नऊ हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. या सर्व कचऱ्याची विल्हेवाट देवनार, मुलुंड आणि कांजूर डम्पिंग ग्राउंडवर केली जाते. क्षमता संपत आल्यानंतरही मुलुंड आणि देवनार डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकला जातो, तर कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडवर तीन हजार मेट्रिक टन कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाते. याच दरम्यान तळोजा आणि ऐरोली येथे पर्यायी डम्पिंग ग्राउंड निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू आहे.