दुष्काळग्रस्त भागात महसूल विभागाची करवसुली थांबवा; काँग्रेस नेत्याची सरकारकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 05:15 PM2024-01-15T17:15:18+5:302024-01-15T17:25:15+5:30
सरकार शेतकरी विरोधी असल्याचे वारंवार सिद्ध होत असल्याचाही केला आरोप
Farmers Issue in Maharashtra: राज्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये महसूल विभागाकडून करवसुली सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यात हा प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. सरकार एकीकडे दावोसवर ३४ कोटींची उधळण करत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांकडून वसुली सुरु आहे. यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारचे वाभाडे काढले आहेत. त्याचबरोबर दुष्काळग्रस्त भागात महसूल विभागाने करवसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, लेखी आदेश वेगळे आणि तोंडी आदेश वेगळे असा खेळ या सरकारने मांडला आहे. सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. दुष्काळग्रस्त भागात सरकारी वसुली, वीजबिल वसुली, कर्जवसुलीला बंदी आहे. तरीही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून वसुली सुरु आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत तुटपुंज्या सवलती आहेत. तरीही महसूल वसुली, कर्जवसुलीचा तगादा लावला जात आहे. अशा संवेदना गमावलेल्या सरकारला शेतकऱ्यांनी जागा दाखवावी.
नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात गाव पातळीवर तलाठ्याकडून करांची वसुली केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याशिवाय अन्य दुष्काळी उपाययोजनांकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. महसूलमंत्र्याच्या जिल्ह्यात महसूल कराची वसुली होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. सरकारने शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊ नये. शेतकऱ्यांकडून वसुली करू नये. दावोसवर उधळपट्टी करताना शेतकऱ्यांचा विचार करावा, अशा शब्दात श्री. वडेट्टीवार यांनी सरकारचे कान उपटले आहेत.