डोंबिवलीजवळ रेल रोको
By admin | Published: January 13, 2017 04:21 AM2017-01-13T04:21:59+5:302017-01-13T04:21:59+5:30
पश्चिमेतील कोपर रोड मार्गावरील सिद्धार्थनगर झोपडपट्टी परिसरात रेल्वे प्रशासनाने नोटीस देत
डोंबिवली : पश्चिमेतील कोपर रोड मार्गावरील सिद्धार्थनगर झोपडपट्टी परिसरात रेल्वे प्रशासनाने नोटीस देत, झोपड्यांवर गुरुवारी कारवाईचा प्रयत्न केला. या वेळी संतप्त झालेल्या शेकडो झोपडीधारकांनी त्याला विरोध करण्यासाठी रेल रोको केला. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक दुपारी १२.१४ ते १२.४० दरम्यान विस्कळीत झाली. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी रेल रोको झाल्याने, प्रशासन व प्रवासी हैराण झाले.
पश्चिमेला अनेक वर्षांपासून सिद्धार्थनगर झोपडपट्टी आहे. राज्य सरकारने १९९५ पर्यंतच्या झोपड्या अधिकृत केल्या आहेत. आमच्या झोपड्याही त्यापूर्वीच्याच आहेत, असा दावा रहिवाशांनी केला. त्यामुळे रेल्वे प्रशासनाची कारवाई योग्य नाही. प्रशासनाच्या दंडेलशाहीचा निषेध करण्यासाठी हा रेल रोको केल्याचे रहिवाशांनी सांगितले.
झोपडीधारक मोठ्या संख्येने एकत्रितपणे रेल्वे रुळांवर उतरल्याने, आधी धिम्या, नंतर जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. उद्घोषणा यंत्रांवरून नेमकी कोणती सूचना द्यायची, असा प्रश्न रेल्वे प्रशासनाला पडला. त्यामुळे बहुतांशी स्थानकांत वेळापत्रकानुसार लोकल न आल्याने गोंधळाचे वातावरण होते. डोंबिवली, कल्याण आणि दिवा, तसेच ठाणे स्थानकात दुपारच्या वेळेस तणावाचे वातावरण होते. (प्रतिनिधी)