टिटवाळ्यात रेल रोको
By admin | Published: January 20, 2017 04:44 AM2017-01-20T04:44:25+5:302017-01-20T04:44:25+5:30
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने बजावलेल्या कारवाईच्या नोटिशीविरोधात रहिवाशांनी गुरुवारी दुपारी टिटवाळा स्थानकात रेल रोको केला.
डोंबिवली/टिटवाळा : आरक्षित भूखंडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने बजावलेल्या कारवाईच्या नोटिशीविरोधात रहिवाशांनी गुरुवारी दुपारी टिटवाळा स्थानकात रेल रोको केला. पालिकेच्या निषेधासाठी सुरू असलेल्या या आंदोलनामुळे जवळपास पाऊण तास रेल्वे वाहतूक ठप्प होती.
टिटवाळ्यातील इंदिरा नगर, आंबेडकर नगर आणि नांदप रोड परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे हे आंदोलन केले. अॅम्युझमेंट पार्क आणि महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचे क्वॉर्टर्स बांधण्यासाठी हे भूखंड आरक्षित आहेत. हे अतिक्रमण हटविण्यासाठी रहिवाशांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. आंदोलनकर्त्यांनी दोन्ही मार्गांवरील रुळावर ठाण मांडल्याने लोकल सेवा ठप्प झाली. त्यामुळे कसाऱ्याहून कल्याणच्या दिशेने अप तसेच कल्याणहून आसनगावच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक सपशेल कोलमडली. परिणामी, ठाण्यापर्यंतची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. रेल रोकोची शक्यताही नसल्याने लोहमार्ग पोलिसांसह रेल्वे पोलीस दलाची पुरेशी तयारी नव्हती. त्यामुळे त्यांची पाचावर धारण बसली. स्थानिक पोलिसांनी वेळीच परिस्थिती हाताळली.
नोटिसा बजावल्याने संतप्त नागरिकांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. रोष व्यक्त करण्यासाठी अधिकारी सापडले नाहीत, म्हणून त्यांनी रेल रोको करत निषेध व्यक्त केला. जमाव प्रचंड असल्याने, त्यात महिलांचे प्रमाण मोठे असल्याने ट्रॅकवरून नागरिकांना हटवताना सुरक्षा यंत्रणेच्या नाकीनऊ आले होते. स्थानकातील दोन्ही फलाटांवर लोकल अडकल्या होत्या. या गोंधळामुळे कसारा, आसनगावसह टिटवाळा मार्गावरील असंख्य प्रवासी ताटकळले होते. टिटवाळा, आंबिवली आणि शहाड स्थानकातील प्रवासी रस्त्यामार्गे कल्याणला आल्याने त्यांची गैरसोय झाली नाही. पण अनेकांच्या खिशाला या घटनेमुळे कात्री बसल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण होते. अखेरीस संध्याकाळी ४.३२च्या सुमारास रेल रोकोनंतर पहिली लोकल कल्याणच्या दिशेने धावल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दिली. लोकल वाहतूक सुरू झाली तरीही जमाव स्थानक परिसरातून न हटल्याने
तणाव कायम होता.
अखेरीस संध्याकाळी ४.५०च्या सुमारास दोन्ही मार्गांवरील लोकल वाहतूक सुरू झाल्याने रेल्वे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. (प्रतिनिधी)
।प्रवाशांना त्रास
नोटीस बजावल्याने संतप्त नागरिकांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. रोष व्यक्त करण्यासाठी अधिकारी सापडले नाहीत, म्हणून त्यांनी रेल रोको करत निषेध व्यक्त केला.
जमाव प्रचंड असल्याने व त्यात महिलांचे प्रमाण मोठे असल्याने ट्रॅकवरून नागरिकांना हटविताना सुरक्षा यंत्रणेच्या नाकीनऊ आले होते. स्थानकातील दोन्ही फलाटांवर लोकल अडकल्या होत्या.