डाव्यांचा संताप, सीएसटीत रास्ता रोको
By admin | Published: February 17, 2015 01:42 AM2015-02-17T01:42:56+5:302015-02-17T01:42:56+5:30
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापूरमध्ये झालेल्या हल्ल्याचे पडसाद मुंबईतही उमटले.
मुंबई : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापूरमध्ये झालेल्या हल्ल्याचे पडसाद मुंबईतही उमटले. सोमवारी दुपारी डाव्या विचारणीच्या विविध पक्ष आणि संघटनांनी एकत्र येत आझाद मैदानात तीव्र निदर्शने केली. शिष्टमंडळाला भेट देण्यास विलंब करणाऱ्या सरकार आणि पोलीस प्रशासनाविरोधात आंदोलनकर्त्यांनी सीएसटी येथे तब्बल अर्धा तास रास्ता रोको करत निषेध नोंदवला.
अंधश्रद्धा निर्मूलनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी मोकाट असताना पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या पुरोगामी विचारणीच्या कार्यकर्त्यांनी दुपारी २ वाजता मोठ्या संख्येने आझाद मैदानात निदर्शने केली. यावेळी हल्लेखोरांना तत्काळ अटक करून मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी सुरू होती. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, जनता दल, एनटीयूआय, गिरणी कामगार संघर्ष समिती, बँक कर्मचारी संघटना अशा विविध पक्ष आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी आणि कार्यकर्त्यांनी मैदान भरून गेले होते. सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करत कार्यकर्ते लोकशाही मार्गाने आपला रोष व्यक्त करत होते.
गृह राज्य मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी केवळ चौकशीचा फार्स न करता तत्काळ हल्लेखोरांना अटक करण्यासाठी कडक पावले उचलावीत, अशी मागणी भाकप नेते प्रकाश रेड्डी यांनी केली. मात्र शिष्टमंडळाला भेट देण्यासाठी पोलिसांकडून विलंब झाला. दाभोलकरा नंतर पानसरे यांच्या हल्लेखोरांचा शोध घेण्याची मागणी करण्यासाठीही पोलिसांकडून मिळणारी वागणूक खेदजनक असल्याच्या यावेळी प्रतिक्रिया उमटू लागल्या. परिणामी चवताळलेल्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोकोचा निर्णय घेतला.
कोळसे-पाटील यांना रडू कोसळले
माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांचा गोविंद पानसरे यांच्याशी चांगलाच ऋणानुबंध आहे. रविवारी कोल्हापुरात आलेल्या कोळसे-पाटील यांचे सोमवारी सकाळी गोविंद पानसरे यांच्याशी फोनवर बोलणे झाले. त्यानुसार ते ९.४० वाजता पानसरे यांच्या घरी भेटायला गेले. त्याचवेळी त्यांना हल्ल्याची माहिती कळाली. रुग्णालयाच्या आवारात अत्यंत विमनस्क अवस्थेत उभे राहिलेल्या कोळसे-पाटील यांना अक्षरश: रडू कोसळले. पत्रकारांशी बोलताना कोळसे-पाटील म्हणाले की, आता पुरोगामी कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापुढच्या काळात आमची सुरक्षा आम्हाला स्वत:च करावी लागणार आहे.
पोलिसांच्या हातावर आंदोलकांची तुरी
च्साधे निवेदन घेण्यासही दिरंगाई करणाऱ्या पोलिसांविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोकोचा निर्णय घेतला. दोन-दोन कार्यकर्ते हळू-हळू मैदानाबाहेर पडू लागले. तितक्यात आंदोलनाची चाहूल लागल्याने पोलिसांनी मैदानाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले. मात्र ज्येष्ठ भाकप नेते प्रकाश रेड्डी पोलिसांच्या हातावर तूरी देऊन काही कार्यकर्त्यांसोबत मागील गेटने बाहेर पडले.
लेट लतिफ अधिकारी
सायंकाळी चार ते साडेचार वाजेपर्यंत आंदोलनकर्त्यांनी सीएसटीची वाहतूक रोखली होती. त्यावेळी स्थानिक वरिष्ठ पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपायुक्त परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या रोषाबाबत विचारणा केली असता झोन १ चे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांना कोणतीही कल्पना नव्हती.
अर्धा तास सीएसटी ठप्प
पुढे पाठवलेल्या काही कार्यकर्त्यांसोबत रेड्डी यांनी थेट सीएसटी रेल्वे स्थानकाबाहेरील मुख्य रस्ता अडवला. मोजक्याच मात्र आक्रमक अशा तरुण आणि महिला कार्यकर्त्यांनी चौकातच ठिय्या मांडून वाहतूक रोखली. पोलिसांच्या तुलनेत संख्येने कमी असलेले कॉम्रेड पोलिसांना भारी पडले. सीएटी चौकातील सातही रस्ते कार्यकर्त्यांनी तब्बल अर्धा तास रोखून ठेवले होते. परिणामी सातही मार्गांवर वाहतूक कोंडी झाली.
गृहराज्यमंत्र्यांची गाडी अडविली!
कोल्हापूर : गोविंद पानसरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलेले गृहराज्यमंत्री राम शिंदे यांचे वाहन पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सोमवारी शास्त्रीनगर येथील खासगी रुग्णालयासमोर अडविले.
संतप्त कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या गाडीच्या दिशेने चप्पल फेकली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. पोलिसांनी तातडीने कार्यकर्त्यांना हटवून त्यांच्या वाहनाचा मार्ग मोकळा केला.
शास्त्रीनगरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या पानसरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास राम शिंदे आले होते. पानसरे यांच्या तब्येतीची माहिती घेऊन व पत्रकार परिषद झाल्यानंतर शिंदे यांचा ताफा प्रवेशद्वारातून बाहेर पडत होता. त्याचवेळी दुसऱ्या प्रवेशद्वारातून पानसरे समर्थक बाहेर आले. त्यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांविरोधात घोषणाबाजी करत शिंदे यांचे वाहन अडविले व ते वाहनासमोर झोपले. काहींनी वाहनावर लाथा मारल्या.
अन् दाभोलकरांच्या आठवणी जाग्या झाल्या...
डॉ. दाभोलकरांनंतर आता गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला म्हणजे विवेकावरच हल्ला आहे. त्यामुळे आता तरी शासनाने झोपेचे सोंग सोडून त्वरित यावर कारवाई करावी आणि या सनातनी शक्तींची पाळेमुळे उपटावीत.
- पुष्पा भावे, ज्येष्ठ विचारवंत
कॉ. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवरील हल्ला हा नथुरामजाद्यांचेच कटकारस्थान आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी अजून सापडलेले नाहीत. पण नवीन सरकार आल्यावर नथुरामजाद्यांचे बळ वाढले आहे.
- आ. कपिल पाटील, अध्यक्ष, लोकभारती
गेल्या काही वर्षांत समाजातील तरुण पिढीच्या मनात द्वेषाची मानसिकता निर्माण केली जातेय. त्याचे रूपांतर अशा भ्याड हल्ल्यांमध्ये दिसून येते आहे. परंतु, द्वेषाला खतपाणी घालणारेच सरकार असल्याने ते ढिम्मच आहे!
- अजित अभ्यंकर, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते
कॉ. पानसरे व त्यांच्या पत्नीवर झालेला हल्ला अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर पुण्यात झालेला हल्ला आणि पानसरे यांच्यावर कोल्हापुरात झालेल्या हल्ल्यात प्रथमदर्शनी साधर्म्य दिसून येते.
- माणिकराव ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
दाभोलकरांच्या हत्येनंतर शासनाने दाखविलेल्या नाकर्तेपणामुळेच अशा शक्तींना बळ मिळते आहे. शासनाने कारवाई न केल्यास डाव्यांची चळवळ तीव्र होऊन राज्यभर त्याचे पडसाद उमटतील.
- कॉ. भालचंद्र कांगो, भाकप नेते
हा हल्ला म्हणजे सुनियोजित कट असून, हा हल्ला डॉ. दाभोलकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यासारखाच आहे. डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी अजूनही सापडले नाहीत. अशा प्रकारचे भ्याड हल्ले होतच राहतील का?
- हुसेन दलवाई, खासदार
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नीवर सकाळी कोल्हापुरात झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. त्यांच्यावरील उपचारांना यश यावे व त्यांनी लवकर बरे व्हावे.
- रावसाहेब दानवे-पाटील,
प्रदेशाध्यक्ष, भाजपा
पुरोगमि महाराष्ट्रात आणि शाहू महाराजांच्या कोल्हापुरात अशी घटना घडते हे लाजिरवाणे आहे.कामगार आणि कष्टकरी लोकंसाठी सतत काम करणारे पानसरे यांच्यावर झालेला हल्ला निशितच भ्याड आहे.
- बच्चू कडू, आमदार
महाराष्ट्राच्या परंपरेला कलंकित करणारा अशोभनीय प्रकार आहे. या हिंसक हल्ल्यामुळे विचारवंतांचे विचार मरणार नाहीत. परिवर्तनाचा विचार कधी मरणार नाही.
- रामदास आठवले, राष्ट्रीय अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया
डॉ. दाभोलकरांचे खुनी सरकारला पकडता आले नाहीत. आता दोन्ही विचारवंताचे आरोपी शोधून काढणे तसेच सुदृढ लोकशाहीला मारक ठरणाऱ्या शक्तींचा शोध घेणे ही शासनाची जबाबदारी आहे.
- कुमार सप्तर्षी, अध्यक्ष, युक्रांद
देशातल्या आणि राज्यातल्या नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे पुरोगामी महाराष्ट्रात असे प्रकार घडत आहे.
- विनोद शिरसाठ,
संपादक, साधना साप्ताहिक
हा हल्ला लोकशाहीला कलंक असून, मानवतेवरील हल्ला आहे. कोल्हापूरच्याच नव्हेतर महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात कष्टकरी व उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी ६० वर्षांहून अधिक काळ कॉ. गोविंद पानसरे हे संघर्ष करीत आहेत. अशा विचारवंतांचे विचार दाबण्यासाठी अशा प्रकारचा भ्याड हल्ला करणे ही बाब दुर्दैवी आहे.
- छगन भुजबळ,
अध्यक्ष, समता परिषद
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणारे आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या धर्मांध शक्तीचा शोध घ्यायला हवा. पुरोगामी लोकांनी एकत्र येऊन या शक्तींचा मुकाबला करायला हवा. राज्यातील सर्व गिरणी कामगार या आंदोलनात सामील होतील.
- दत्ता इस्वलकर,
गिरणी कामगार नेते
धर्मांध शक्ती आणि भांडवलशाही या दोन गोष्टींविरोधात पानसरे यांचा लढा सुरू होता. त्यामुळे केवळ एकांगाने तपास न करता दोन्ही बाबींचा विचार करायला हवा. शिवाय केवळ हिंदुत्ववादी शक्तीच नव्हे, तर इतर धर्मांमधील धर्मांध शक्तींचाही कसून तपास केला पाहिजे. लाल निशाणतर्फे या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करतो.
- मिलिंड रानडे, एनटीयूआय
परिवर्तनाला विरोध असलेल्या प्रवृत्तींविरोधात पानसरे लिहीत होते, बोलत होते. त्यामुळे या प्रवृत्तींनीच त्यांच्यावर भ्याड हल्ला केला आहे. दाभोलकर यांच्याप्रमाणे पानसरे यांचे हल्लेखोरही सत्तेच्या आसपास असल्याचा संशय आहे. पोलिसांनी तत्काळ हल्लेखोरांना अटक केली नाही, तर तो संशय बळकट होईल.
- विश्वास उटगी, भाकप
मनुवादी प्रवृत्तीविरोधात पानसरे यांनी परिवर्तनवादी चळवळ सुरू केली होती. त्याचा धसका घेतलेल्यांनी दाभोलकर यांच्याप्रमाणेच त्यांचा काटा काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. जणूकाही परिवर्तनवादी चळवळ नष्ट करण्यासाठी मनुवाद्यांनी सुपारी घेणारे एजंट नेमले आहेत. त्यामुळे तत्काळ हल्लेखोरांना अटक केली नाही, तर मंत्रालयाला टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही.
- ज्योती बडेकर, जनता दल
राज्यात लोकशाही नव्हे, तर पेशवाई आल्यासारखे वाटत आहे. नेमका हल्ला कोणी केला, हे आत्ताच म्हणणे योग्य ठरणार नाही. मात्र लोक रस्त्यावर उतरत असून पानसरे एकटे नसून ते लाखो लोकांचा विचार असल्याचे हल्लेखोरांनाही कळाले असेल. सरकारनेही ते ध्यानात घेण्याची गरज आहे.
- आनंद पटवर्धन, चित्रपट दिग्दर्शक