प्रचारतोफा थंडावल्या
By admin | Published: October 13, 2014 06:16 PM2014-10-13T18:16:40+5:302014-10-13T18:17:11+5:30
युती - आघाडीमधील 'घटस्फोट', पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा, बंडखोरी, 'लक्ष्मीदर्शन' यामुळे चर्चेत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपला.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - युती - आघाडीमधील 'घटस्फोट', पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झंझावाती सभा, बंडखोरी, 'लक्ष्मीदर्शन' यामुळे चर्चेत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपला. प्रचाराची मुदत संपेपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी चांगलीच धावपळ सुरु होती.
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी मतदान होणार असून आज संध्याकाळी सहापर्यंत प्रचाराची मुदत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कोकणमध्ये तीन सभा घेतल्या. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दक्षिण कराडमध्ये भव्य रोड शो काढून शक्तीप्रदर्शन केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमध्ये सभा घेऊन प्रचाराचा समारोप केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगावमध्ये प्रचार सभा घेतली. स्टार प्रचारकांच्या प्रचार सभा सुरु असतानाच उमेदवारांनी स्थानिक पातळीवर रोड शो, चौक सभा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
प्रचार आज संपला असून आता सर्वांचे लक्ष मतदानाकडे लागले आहे. बुधवारी (१५ ऑक्टोबर) राज्यातील ९० हजार ४३० मतदान केंद्रावर राज्यातील आठ कोटी १४ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.