नातेवाइकांचा रास्ता रोकोचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2016 05:15 AM2016-10-08T05:15:06+5:302016-10-08T05:15:06+5:30

सावित्री दुर्घटनेतील बेपत्ता प्रवाशांच्या संतप्त नातेवाइकांनी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासमोर शासन यंत्रणेबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

Stoppage of relatives | नातेवाइकांचा रास्ता रोकोचा इशारा

नातेवाइकांचा रास्ता रोकोचा इशारा

Next


महाड : सावित्री दुर्घटनेतील १५ बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यात सोमवारी सहाव्या दिवशीही अपयश आल्याने या बेपत्ता प्रवाशांच्या संतप्त नातेवाइकांनी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासमोर शासन यंत्रणेबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. आता आमच्या भावनांशी शासनाने खेळू नये. शासकीय यंत्रणा केवळ व्हीआयपी आणि मंत्री महोदयांच्या पाहुणचारात गुंतलेली आहे असा आरोप करीत या संतप्त व शोकाकुल नातेवाइकांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला.
उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी सावित्री पूल दुर्घटनास्थळी भेट देवून या दुर्घटनेत मृत पावलेल्या तसेच बेपत्ता झालेल्या प्रवाशांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. राजापूर येथील प्रमोद सुर्वे यांना याबाबत तीव्र शब्दात संताप व्यक्त करताना अश्रू अनावर झाले. याठिकाणी येणारे मंत्री महोदय केवळ पुलाजवळ फोटो सेशन करून मीडियाशी बोलून जात आहेत. मात्र एकाही मंत्र्याने बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाइकांची याठिकाणी भेट घेतलेली नाही, शोधकार्य करणारे एनडीआरएफचे जवान आता मृतदेह शोधूनही सापडत नसल्याने थकलेले आहेत, त्यामुळे केंद्र शासनाने याठिकाणी नव्याने फौज पाठवून शोधकार्य करावे, अशी मागणीही या नातेवाइकांनी ठाकरे यांच्याकडे केली.
मृतांच्या व बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाइकांची प्रशासनाने कुठलीही सोय केलेली नाही तर मुस्लीम समाजाच्या अंजुमन दुर्दबंद ट्रस्ट व एमएमएने आमची सोय केल्याने या नातेवाइकांनी सांगताना शासनाच्या निष्क्रियतेवर कडक शब्दात ताशेरे ओढले, मात्र ठाकरे यांनी या सर्व नातेवाइकांची समजूत काढत धीर दिला. प्रशासनाने परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. याबाबत उपसभापती म्हणून आपण शासनाला कठोर पावले उचलण्यास भाग पाडू असेही ठाकरे म्हणाले. (वार्ताहर)
>बेपत्ता प्रवाशांना मृत घोषित करा- माणिक जगताप
सावित्री दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या तसेच शोध घेवूनही तपास न लागलेल्या प्रवाशांना शासनाने मृत घोषित करावे अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांनी यावेळी केली.
सन २००५ जुलैमध्ये मी आमदार असताना महाड तालुक्यातील बेपत्ता दरडग्रस्तांबाबत मृत घोषित करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर या सावित्री दुर्घटनेतही बेपत्ता प्रवाशांबाबत शासनाने मृत घोषित करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी जगताप यांनी यावेळी केली.

Web Title: Stoppage of relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.