लातूरला जाणारे पाणी रोखले; टँकर पॉइंटची तोडफोड
By admin | Published: March 11, 2016 04:21 AM2016-03-11T04:21:32+5:302016-03-11T04:21:32+5:30
लातूरकरांची तहान भागविणारे तीसखेडी योजनेतील पाणी गुरुवारी गावकऱ्यांनी रोखले. दुपारी अज्ञात २५ ते ३० नागरिकांनी माळकोंडजी जवळ असलेल्या टँकरच्या थांब्याची तोडफोड केली.
लातूर : लातूरकरांची तहान भागविणारे तीसखेडी योजनेतील पाणी गुरुवारी गावकऱ्यांनी रोखले. दुपारी अज्ञात २५ ते ३० नागरिकांनी माळकोंडजी जवळ असलेल्या टँकरच्या थांब्याची तोडफोड केली. त्यामुळे दुपारनंतर पाणीपुरवठा झाला नाही.
माकणी धरणातून जिल्हा परिषदेच्या तीसखेडी योजनेचे पाणी लातूरला ६ मार्चपासून टँकरद्वारे सुरू आहे. प्रकल्पातील पाणी लातूरला दिल्यास लवकर संपेल. त्यानंतर आपणाला पाणी मिळणार नाही, अशी भीती किल्लारी परिसरातील गावांना आहे. परिणामी, लातूरला देण्यात येणाऱ्या पाण्याला किल्लारीपासून विरोध सुरू झाला आहे. किल्लारीच्या सरपंचांनी पाणी लातूरला देण्यात येऊ नये, यासाठी आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे. शुक्रवारी किल्लारीत रास्ता रोको आंदोलन होणार आहे. या विरोधातूनच गुरुवारी दुपारी औसा तालुक्यातील माळकोंडजी येथे असलेले टँकर पॉइंट बंद करण्यात आले. मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी या संदर्भात आपणाला माहिती नाही. माहिती घेऊन काय प्रकार आहे तो पाहू, असे सांगितले. (प्रतिनिधी)