एकपात्री कलावंतांची तूफान बॅटिंग

By Admin | Published: February 8, 2015 11:39 PM2015-02-08T23:39:13+5:302015-02-08T23:39:13+5:30

रंगमंचावर एकटा उभा राहिलेला माणूस अत्यल्प किंवा कोणतीही सामग्री न वापरता जास्तीत जास्त परिणाम कसा साधू शकतो,

Storm Batting of Monopoly Workers | एकपात्री कलावंतांची तूफान बॅटिंग

एकपात्री कलावंतांची तूफान बॅटिंग

googlenewsNext

बेळगाव (सुधीर मोघे रंगमंच) : रंगमंचावर एकटा उभा राहिलेला माणूस अत्यल्प किंवा कोणतीही सामग्री न वापरता जास्तीत जास्त परिणाम कसा साधू शकतो, याचा अनुभव बेळगावकरांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या १५ कलावंतांनी दिला. नाट्य संमेलनाच्या निमित्ताने ही मोठी मेजवानी ठरली.
दिलीप खन्ना यांनी रोजच्या जीवनात घडणाऱ्या विनोदी घटना सांगून प्रत्येक गोष्ट खेळकरपणे घेतली पाहिजे, असा संदेश दिला. यवतमाळचे डॉ. दिलीप अलोणे यांनी ‘मला निवडून द्या’ हा कार्यक्रम सादर केला. निवडणुकीला उभ्या राहिलेल्या नेत्यांची मते मागण्याची वेगवेगळी शैली कसा विनोद निर्माण करते हे त्यांनी दाखविले. मात्र, कोणत्याही नेत्याची मिमिक्री त्यांनी टाळली.
डोंबिवलीच्या वीणा खाडिलकर यांनी खड्या आवाजात केलेले कीर्तन रसिकांची दाद मिळवून गेले. स्त्री आहे तर घराला अर्थ आहे, हा त्यांच्या कीर्तनाचा आशय होता. स्त्रीचा सन्मान करण्याचा संदेश देणाऱ्या या कीर्तनाला रसिकांनी प्रतिसाद दिला.
व्यंगचित्रकार संजय मिस्त्री यांनी टू डी आणि थ्रीडी व्यंगचित्रे दाखवून चित्रांमधील विनोद कसा शोधायचा, याचे मार्गदर्शन केले. मुंबईचे अशोक बोंडे यांनी ‘वाचाल तर वाचाल’ हा आगळा प्रयोग सादर केला. मराठीचे मुख्याध्यापक असलेले बोंडे यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व असल्याने शब्दांमधून कशा गमतीजमती होतात हे त्यांनी मार्मिकपणे दाखवून दिले. राजदीप कदम या तरुणाने पशु-पक्षी आणि वेगवेगळ्या वस्तूंचे आवाज लीलया काढून दाखविले. खेड्यातील जीवनाचा अनुभव त्यांनी प्रेक्षकांना केवळ आवाजाद्वारे दिला.
चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन कसा असतो, हे मेघना साने यांनी ‘कोवळी उन्हे’ या एकपात्री प्रयोगातील कथेद्वारे दाखवून दिले. सांगलीचे शरद जाधव या तरुणाने खेड्यातील शाळेत घडणारे विनोद आणि खेड्यातील बेरकी माणसांच्या विनोदी कहाण्या सादर केल्या. सातारच्या अमित शेलार यांनी ‘एक दिवस असंच घडेल’ ही कथा सादर केली. हलक्या विनोदाकडून ही कथा हळूहळू गंभीर होत गेली आणि शेवटी सामाजिक संदेश देऊन गेली. सातारचे अभय देवरे यांनी ‘गंमत गप्पा’ या त्यांच्या कार्यक्रमातील काही चुटके सादर केले. ठाण्याचे माधव धामणकर यांनी ‘हा खेळ सावल्यांचा’ हा कार्यक्रम सादर केला. पडद्यावर हाताच्या, बोटांच्या सावल्यांमधून आकार निर्माण केले. पुण्याचे संतोष चोरडिया यांनी मिमिक्री सादर केली. (खास प्रतिनिधी)

Web Title: Storm Batting of Monopoly Workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.