किनारपट्टीवर वादळाचा सामना करणारी घरे, शरदनगर उभारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 03:11 AM2020-06-12T03:11:12+5:302020-06-12T03:11:19+5:30
म्हाडाचा पुढाकार; शरदनगर नावाने वसाहती उभारणार
मुंबई : निसर्गवादळाने कोकणच्या किनारपट्टीवर थैमान घातले. वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे शेकडोघरांचे नुकसान झाल्याने येथील कुटुंब रस्त्यावर आली. त्यामुळे किनारपट्टीवर धडकणाऱ्या अशा वादळांचा मुकाबला करणारी भक्कम घरे उभारण्यासाठी आता म्हाडा कंबर कसणारआहे. कमी किंमतीतली आणि प्री कास्ट या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभारल्या जाणाºया या वसाहतींचे नामकरण शरद नगर असे होईल अशी माहिती हाती आली आहे.
गेल्या काही वर्षांत किनारपट्टीवरील धडकणाºया वादळांची संख्या वाढली आहे. केरळ, पश्चिम बंगाल या राज्यांना नुकताच त्याचा जबरफटका बसला आहे. गेल्या आठवड्यात कोकण किनरापट्टीने निसर्ग वादळाचे तांडव अनुभवले. वातावरणातील बदलांमुळे अशा स्वरुपाच्या नैसर्गिक प्रकोपाची संख्या येत्या काळात वाढणार असल्याचे भाकीत पर्यावरण तज्ज्ञांकडून सातत्याने व्यक्त केले जात आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर
मजबूत घरे उभारण्याचा विचार
पुढे आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या भागाचा पाहणी दौरा केला. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र
आव्हाड यांच्या आदेशानुसार म्हाडाने कोकण किनारपट्टीवरील गृहनिर्माणासाठी कंबर कसली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हाडाला शंभर कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. त्या निधीतून कोकणातील प्रत्येक तालुक्यात आवश्यकतेनुसार घरे बांधणीचे नियोजन केले जाईल.
अंतिम मुसदा लवकरच
साधारण साडे चार लाख रुपयांमध्ये वादळाचा आणि पूर परिस्थितीचा नेटाने सामना करणारी घरे उभारली जातील अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. घरांसाठी जमीन कशा पद्धतीने मिळवायची, सर्वोत्तम दर्जाची घरे उभारणीसाठी कुठले प्रगत तंत्रज्ञान जगभारात उपलब्ध आहे, या सर्वंचा सखोल अभ्यास करून या धोरणाचा अंतिम मसुदा म्हाडाचे अधिकारी लवकरच तयार करती असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.