वादळातील पणती: भुवनेश्वर कुमार

By admin | Published: May 10, 2014 12:41 AM2014-05-10T00:41:39+5:302014-05-10T00:41:39+5:30

दिल्लीच्या मोहम्मदचा वेगही ‘शम’ला; पण या वादळात एक पणती मात्र लुकलुकत राहिली, तिचे नाव आहे - भुवनेश्वर कुमार !

Storm Quantity: Bhubaneswar Kumar | वादळातील पणती: भुवनेश्वर कुमार

वादळातील पणती: भुवनेश्वर कुमार

Next

विश्वास चरणकर

कोल्हापूर आयपीएलच्या मैदानात मॅक्सवेल, गेल, मिलर, पोलार्ड, स्मिथ, ड्युमिनी, डिव्हिलियर्स, धोनी अशी अनेक वादळे घोंघावत आहेत. या वादळांत हैदराबादच्या डेलची स्टेन‘गन’ बंद पडली, कोलकात्याच्या सुनीलला ‘नारायण, नारायण’चा जप करावा लागला, पंजाबी जॉन्सनचे अवसान गळाले, मद्रासी अश्विनला ‘रवि-चंद्र’ आठवला, दिल्लीच्या मोहम्मदचा वेगही ‘शम’ला; पण या वादळात एक पणती मात्र लुकलुकत राहिली, तिचे नाव आहे - भुवनेश्वर कुमार ! आयपीएल म्हणजे ‘दे घुमा के’ बॅटिंगचा नुसता जल्लोष. २0 षटकांत जास्तीत जास्त धावा कुटायच्या असतात. मग गोलंदाजांची कत्तल ठरलेली; पण काही गोलंदाज मात्र यातही तग धरून आहेत. ‘मुंबई इंडियन्स’चा लसिथ मलिंगा, ‘आरसीबी’चा यजुवेंद्र चहल, ‘केकेआर’चा साकिब अल हसन, ‘राजस्थान’चा प्रवीण तांबे यांनी आपली आब राखली आहे; पण या सर्वांत उजवा ठरतो तो भुवनेश्वर कुमार. या आयपीएलमध्ये सर्र्वांत जास्त चर्चा होते आहे ती मॅक्सवेलची. सात सामन्यांत ४३५ धावा. यात तीनदा नव्वदी गाठलेली, तर एकदा सत्तरी. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेलने ९५ धावांची तुंबडी भरली; पण या सामन्यात भुवनेश्वरची गोलंदाजी पाहा- ४ षटके, १९ धावांत ३ बळी. यातही १५ डॉटबॉल. आहे की नाही कमाल पोराची? आतापर्यंतच्या संपूर्ण स्पर्धेत त्याने सातत्याने चांगली गोलंदाजी केली आहे. त्याच्याकडे वेग नाही, पण स्विंग हे त्याचे मुख्य अस्त्र आहे. नव्या चेंडूला क्रिजच्या कोपर्‍यातून असा आत आणतो की फलंदाजाची भंबेरी उडते. विशेषत: उजव्या हाताचा फलंदाज ‘बॅकफूट की फ्रंटफूट’ या डायलेमामध्ये प्रिन्स हॅम्लेट केव्हा होतो, हे त्याचे त्याला कळतच नाही. महान फलंदाज सचिन तेंडुलकरला त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत पहिला भोपळा देणार्‍या भुवनेश्वरला ‘आयपीएल’च्या तिसर्‍या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने पहिली संधी दिली. सध्या तो हैदराबाद सनरायझर्स संघाकडून खेळतोय. या संघात जगातील अव्वल वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या बरोबरीने तो नवा चेंडू हाताळतो आहे. त्याचा शानदार फॉर्म संपूर्ण आयपीएलमध्ये असाच बहरत राहिला तर चांगलेच आहे; कारण आयपीएलनंतर भारताला इंग्लंडचा दौरा करायचा आहे. तेथील हिरव्यागार खेळपट्ट्यांवर परफॉर्म करणे भुवनेश्वरसाठी आनंददायीच ठरेल. ४गुरुवारी अहमदाबाद येथे झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात भुवीने १४ धावांत ४ बळी घेतले. याच सामन्यात त्याच्या डोक्यावर पर्पल कॅप आली. ४यंदाच्या आयपीएलमध्ये भुवीचा हा सातवा सामना होता. या सामन्यापर्यंत भुवीने २७.३ षटके टाकली आहेत. त्यांत त्याने १५0 धावा देऊन १४ बळी घेतले आहेत. १0.७१ अशी त्याची सरासरी असून, तो या यादीत अव्वल क्रमांकावर आहे.

Web Title: Storm Quantity: Bhubaneswar Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.