रावसाहेब दानवेंच्या विधानांवरुन वादळ
By admin | Published: January 21, 2017 09:22 PM2017-01-21T21:22:22+5:302017-01-21T21:22:22+5:30
1000, 500च्या जुन्या नोटा मला आणून द्या. मी बदलून देतो,गेल्या वर्षी राज्यात दुष्काळ नव्हता. आम्ही ओरड केल्यामुळे मदत मिळाली, अशी विधाने रावसाहेब दानवे यांनी केल्याचा काँग्रेस व राष्ट्रवादीचा आरोप
Next
>ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 21 - तुम्ही एक हजार व पाचशेच्या जुन्या नोटा मला आणून द्या. त्या मी बदलून देतो तसेच गेल्या वर्षी राज्यात दुष्काळ नव्हता. आम्ही ओरड केल्यामुळे मदत मिळाली, अशी विधाने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केल्याचा आरोप करत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी त्यांच्यावर सडकून टीका सुरू केली. चिखलीतील जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
त्यानंतर वृत्तवाहिन्यांनी माझ्या भाषणातील काही विधाने मोडतोड करून सांगितली आणि माझ्या विधानांचा विपर्यास करून दाखविला, असे दानवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आपण चिखली येथील सभेत दुष्काळ आणि ५00 तसेच एक हजार रुपयांच्या नोटांविषयी काही विधाने केली होती. मात्र ती तशीच्या तशी न मांडता त्यांचा विपर्यास करण्यात आला आणि त्यामुळे अनर्थ घडला, असेही खा. दानवे यांनी बोलून दाखवले. ते म्हणाले की, माझ्या विधानांचा विपर्यास करण्यात आला. तसेच, मी जे काही बोललो, ते पूर्ण न दाखवता मोडून तोडून दाखविल्याने गैरसमज होत आहेत. गेल्या वर्षी दुष्काळच नव्हता असे मी कसे म्हणेन? कापसाला केंद्र सरकारने मदत दिली नव्हती.
कारण महाराष्ट्रात कापसाचे उत्पादन वाढले, असे केंद्राचे म्हणणे असल्याने त्यांनी दुष्काळाचे निकष कापूस पिकासाठी लावले नाहीत. राज्य सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या तिजोरीतून मदत दिली, असे मी सभेत बोललो होतो. नोटा बदलून देण्याच्या विधानाचा खुलासा करताना ते म्हणाले की, एक हजार, पाचशेच्या नोटा मी कशा बदलून देणार? ग्रामीण भागातील जनतेसमोर बोलताना एक वेगळा बाज असतो, त्यांच्याशी संवाद केल्यासारखे भाषण करावे लागते. तसे करताना मी केलेल्या विधानांचे विरोधकांनी भांडवल करावे, याचे मला आश्चर्य वाटते.
दुष्काळी जनतेची कसली गंमत करता? - धनंजय मुंडे
रावसाहेब दानवे यांच्यावर टीका मुंबई : राज्यात दुष्काळच नव्हता, असे आम्ही ओरडून सांगितले म्हणून मदत मिळाली, हे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे विधान दुष्काळी जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. आता दानवे हे मी गमतीने बोललो, असे म्हणत असले तरी प्रदेशाध्यक्षपद भूषविणारी व्यक्ती अशा विषयात गंमत कशी काय करू शकते असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शनिवारी केला. हे विधान म्हणजे राज्यातील दुष्काळग्रस्त जनतेची चेष्टा करणारे आहे. दुष्काळ जाहीर करा, यासाठी आंदोलने झाली. विधिमंडळाची दोन्ही सभागृहे अनेक दिवस बंद पडली. न्यायालयालाही दुष्काळ जाहीर करा, हे सांगावे लागले. तरीही दानवेंना गंमत सुचत असेल तर हे राज्याचे व शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. दानवे सध्या दुष्काळ नाही म्हणतात, उद्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नाहीत, असे म्हणायलाही ते मागे पुढे पाहणार नाहीत, अशी टीकाही मुंडे यांनी केली.
ईडीमार्फत चौकशीची काँग्रेसची मागणी
चलनातून बाद केलेल्या नोटा मला द्या, मी त्या बदलून नव्या नोटा देतो, असे सांगणाऱ्या रावसाहेब दानवे यांना तात्काळ अटक करून त्यांची अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. सावंत म्हणाले, राज्यभरात नोटा बदलून देणाऱ्या टोळीचा सूत्रधार कोण आहे? हे दानवे यांनी बुलडाणा येथे जाहीर सभेत सांगितले आहे. दानवे हे भाजपाचे सदस्य आणि लोकसभेचे सदस्य असल्याने त्यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन सरकारने त्यांना तात्काळ अटक करावी आणि दानवे आणि प्रदेश भाजपाच्या गेल्या सहा महिन्यांतील सर्व व्यवहारांची ईडीमार्फत चौकशी करावी. नगरपालिका निवडणुकीत रावसाहेब दानवे लक्ष्मीदर्शनाबाबत बोलत होते. ते याच जोरावर हे आता स्पष्ट झाले आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांशी संबंधित बँकांच्या गाड्यातून कोट्यवधींच्या जुन्या आणि नव्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. दानवे यांनी नोटा बदलून देण्याबाबतची जाहीर कबुली दिल्याने भाजपाचे इतर नेतेही या नोटा बदलून देणाऱ्या टोळीचा भाग आहेत असे दिसते, असेही सावंत म्हणाले. (प्रतिनिधी)