कोळसा जाळल्याने वादळे येतच राहणार, Madhav Gadgil यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 08:18 AM2021-10-15T08:18:52+5:302021-10-15T08:19:29+5:30
Madhav Gadgil News: कोळसा मोठ्या प्रमाणावर जाळला जातोय. परंतु, त्यातून पुरेशी वीजनिर्मिती होत नाही. जगात आपण सर्वाधिक कोळसा जाळतोय. यासाठी मोठे उद्योजक गुंतले आहेत.
पुणे : विकास करायचा म्हणून आज अनेक गोष्टींवर भर दिला जात आहे. कोळसा मोठ्या प्रमाणावर जाळला जातोय. परंतु, त्यातून पुरेशी वीजनिर्मिती होत नाही. जगात आपण सर्वाधिक कोळसा जाळतोय. यासाठी मोठे उद्योजक गुंतले आहेत. पण कोळसा जाळल्याने त्यातून एरोसोल (सूक्ष्म कण) वातावरणात जातात. त्याचा आरोग्यावर परिणाम होतो तसेच पर्यावरण बिघडून हवामान बदलते. कोकणात गेल्यावर्षी जो पाऊस झाला, त्याला हेच कारण असू शकते, असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.
इकॉलॉजिकल सोसायटी, पुणेतर्फे जून २०१९मध्ये कोकणात झालेल्या निसर्ग वादळाबाबतचा अभ्यास करून ‘निसर्ग चक्रीवादळ २०१९ निसर्गाचे थैमान’ ही अहवाल तयार करण्यात आला असून त्याचे ऑनलाईन प्रकाशन गाडगीळ यांच्या हस्ते झाले. सोसायटीच्या डॉ. स्वाती गोळे, अजय फाटक, केतकी घाटे, मानसी करंदीकर आदी यावेळी उपस्थित होते.
गुरूदास नूलकर, हर्षद तुळपुळे, अक्षय चव्हाण, समीर दुमाणे, कविता शिंदे यांनी हा अहवाल तयार केला आहे. गौरी बर्गी व नीलम कर्ले यांनी लिखाणात मदत केली आहे.
गाडगीळ म्हणाले, ‘संपूर्ण देशातील सुमारे २० टक्के जमीन देवराईसाठी राखीव आहे. पूर्वी संपूर्ण भारत हिरवाईने आच्छादलेला होता. पूर्वी ग्रामसभा ही हिरवाई जपत असत.
पण १९७२मध्ये कायदा आला आणि वन विभागाच्या ताब्यात सर्व जमिनी गेल्या. त्यानंतर वन विभागाने पैसेवाल्यांसाठी काम करून ग्रामसभेला मात्र त्रास दिला. आज तर विकासाच्या नावाखाली काहीही केले जाते. यामुळे अडचणी येतच राहणार असे ते म्हणाले.
...म्हणून समुद्रकिनारा उथळ झालाय
nशास्त्रीय पुराव्याप्रमाणे समुद्राची पातळी जगभर, विशेषत: उष्ण कटिबंधात अपेक्षेहूनही भराभर वाढते आहे. त्यात भर घालायला इथे इमारतींच्या भाराने आणि भूजलाची पातळी खाली गेल्यामुळे जमीन खचते आहे.
nशिवाय डोंगरांवरची झाडी तुटल्यामुळे आणि खाणींसाठी डोंगर खोदत असल्याने मोठ्या प्रमाणावर गाळ साचून नद्यांच्या, खाड्यांच्या मुखाशी व इतरत्रही समुद्रकिनारा उथळ झाला आहे, असे गाडगीळ म्हणाले.