अधिवेशनावर वादळी ढग, विरोधकांचा हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 05:40 AM2017-12-11T05:40:52+5:302017-12-11T05:41:06+5:30
विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकत विरोधकांनी सरकारवर केलेला हल्लाबोल आणि आमच्याकडे विरोधकांच्या हल्लाबोल नव्हे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकत विरोधकांनी सरकारवर केलेला हल्लाबोल आणि आमच्याकडे विरोधकांच्या हल्लाबोल नव्हे, ‘डल्लामार’ यात्रेचे भरमसाट पुरावे असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला इशारा लक्षात घेता हे अधिवेशन वादळी ठरणार असे दिसते.
मुख्यमंत्र्यांचा मोबाइल तपासा
भाजपाचे नेते मुन्ना यादव हे फरार आहेत. त्यांना शोधण्यात पोलिसांना अपयश येत आहे. यादव सापडत नसेल तर मुख्यमंत्र्यांच्या मोबाइलचा सीडीआर तपासा, म्हणजे यादवांचे लोकेशन कळेल, असा चिमटा मुंडे यांनी काढला.
भाजपा, उद्धव हेच लाभार्थी
कोट्यवधी रुपये खर्च करून सरकारने ‘मी लाभार्थी, हे माझे सरकार’ अशा फसव्या जाहिराती केल्या आहेत. मात्र, भाजपा व शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे दोन या सरकारचे खरे लाभार्थी आहेत, अशी बोचरी टीका विरोधकांनी केली.
राधाकृष्ण विखे पाटील व धनंजय मुंडे या विरोधी पक्षनेत्यांसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदींनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत गेल्या तीन वर्षांत सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याचा आरोप केला.
सरकारने दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. आता जनता ‘क्या हुवा तेरा वादा...’ असे मुख्यमंत्र्यांना विचारू लागली आहे. भाजपाच्या खासदार, आमदारांमध्येही खदखद आहे. नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. ओखी वादळ हे नैसर्गिक संकट होते, तर भाजपाचे सरकार सुलतानी संकट आहे, अशी टीका त्यांनी केली. सरकारच्या विविध मंत्र्यांचे विविध घोटाळे आम्ही बाहेर काढले. गुजरातमध्ये जसा ‘विकास’ पागल झाला आहे, तशी महाराष्ट्रात ‘पारदर्शकता’ पागल झाली आहे, अशी टीका मुंडे यांनी केली.