वादळी प्रारंभ!

By admin | Published: July 14, 2015 03:30 AM2015-07-14T03:30:09+5:302015-07-14T04:48:59+5:30

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात वादळी ठरली. विरोधी पक्ष सदस्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच

Stormy start! | वादळी प्रारंभ!

वादळी प्रारंभ!

Next

चिक्की, डिग्री आणि पदवीचा मुद्दा गाजला

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात वादळी ठरली. विरोधी पक्ष सदस्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे या मागणीसाठी विधानसभा दणाणून सोडली. या गदारोळात सरकारने कामकाज उरकले.
‘जॉनी जॉनी यस पप्पा’ या कवितेचे विडंबन करीत महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची ‘चिक्की’, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची बोगस डिग्री आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची पदवी, अशा घोटाळ्यांची खिल्ली उडवून विरोधकांनी सत्तापक्षाला घायाळ केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी नेते सकाळी ११.१५ पासूनच विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसले. काही आमदारांच्या हातात फलक होते. त्यावर ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’ आदी घोषणा लिहिलेल्या होत्या. (विशेष प्रतिनिधी)

सभागृहातही नारेबाजी
- सभागृहातही गोंधळच होता. विधानसभेचे सदस्य घोषणा देतच सभागृहात आले. कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे, शेतकरी आत्महत्येची परवानगी मागत आहेत. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या आणि सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करा, अशी मागणी केली.
- अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी पुढील कामकाज पुकारले तेव्हा विरोधी सदस्य वेलमध्ये येऊन घोषणा देऊ लागले. त्यांनी फलकही दाखविले. कागदपत्रे सभागृहासमोर ठेवणे, पुरवणी मागण्या असे आजच्या कामकाजाचे स्वरूप होते.
- गदारोळात ते उरकले. त्यानंतर सभागृहाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकप्रस्ताव मांडला; त्यावर दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी भावना व्यक्त केल्या.

विधान परिषदेतही गदारोळ...
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावर आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधान परिषदेत जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले.

जॉनी जॉनी यस पप्पा...!
विरोधकांच्या प्रतिभेला आज चांगलाच बहर आला होता. कवितेचे विडंबन, उपरोधिक शेरेबाजी आणि जोरदार घोषणाबाजीने विधिमंडळाचा परिसर दणाणून गेला होता.
पंकजा पंकजा... यस पप्पा
इटिंग चिक्की... यस पप्पा
विनोद विनोद... यस पप्पा
बोगस डीग्री... यस पप्पा
लोणीकर लोणीकर... यस पप्पा
दोन दोन बायका... हा हा हा
अशा मजेशीर कविता म्हणत विरोधकांनी भाजपा मंत्र्यांचं स्वागत केलं.
हा भावनांशी खेळ मात्र, ‘पप्पा’ या शब्दाने मंत्री पंकजा मुंडे यांच्या भावना दुखावल्या. मी माझ्या वडिलांना गमावले आहे. विरोधकांनी भावनांशी खेळण्याचा प्रकार करू नये. विरोधकांच्या कोणत्याही प्रश्नाला सडेतोड उत्तर देण्याची माझी तयारी आहे, असे पंकजा पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.

Web Title: Stormy start!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.