हरलेल्या आयुष्याला गिटारच्या 'यशस्वी ' सुरांनी सजवणाऱ्या '' त्या '' मित्राची कहाणी..
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 06:35 PM2019-06-21T18:35:07+5:302019-06-21T18:40:36+5:30
आयुष्यात येणाऱ्या सततच्या अपयशामुळे आयुष्य संपवण्याचा विचार त्याच्या मनात डोकावू लागला.पण..गिटारच्या सुरांनी त्याचं आयुष्य बदललं...
पुणे : चित्रपटाला शोभेल अशी 'त्या' ची कहाणी.. शिक्षणातही एकाच वर्गात दोनदा नापास म्हणून शिक्का त्याच्या वाटेला आला .शाळेला रामराम ठोकल्यानंतर त्याला ४४० व्होल्टेज प्रेमभंगाचा झटका त्याला सहन करावा लागला. सगळीकडे फक्त अपयशाचा अंधार. आयुष्यात येणाऱ्या सततच्या अपयशामुळे आयुष्य संपवण्याचा विचार त्याच्या मनात डोकावू लागला.पण... रस्त्यावरच्या एका भेटीने त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली..गिटार वादनाने कलेच्या प्रांतात यशाची उत्तुंग भरारी घेत आयुष्याला अर्थ व इतरांच्या जीवनाला गिटारच्या सुरांनी सजवणाऱ्या ' त्या' मित्राची जागतिक संगीत दिनानिमित्त ही कहाणी....!
त्याचं नाव सनी मच्छिंद्र पाचर्णे.. अभ्यासाची आवड नसल्याने सहावी, सातवी आणि आठवीला प्रत्येकी दोन वेळा नापास झालेला हा मुलगा.. एकेदिवशी नैराश्यातून वडिलांनी रागाच्या भरात त्याचे दप्तर मुळा मुठा नदीत दप्तर फेकून दिले. त्याचवेळी शाळेचा प्रवास वाहणाऱ्या पाण्यात वाहून गेला. अज्ञान , टुकार साथसंगत, मौजमजा यातून गुंडगिरीकडे वाटचाल सुरु झाली. मात्र, एक दिवस आई वडिलांनी शाळा शिकायची नसेल आणि घरात राहायचे असेल, तर गुंडगिरी सोडून काम करून दोन पैसे कमवावे लागतील. तरच घरात जागा मिळेल, असा सज्जड दम दिला.
त्यानंतर कोरेगावपार्क येथील एका जिममध्ये साफसफाईचे काम मिळाले. फेसबुकच्या माध्यमातून पुण्याबाहेरील मुलीशी प्रेम जुळले. कामाच्या ठिकाणी सततचा होणारा अपमान प्रेमाच्या दुनियेमुळे फारसा लक्षात राहत नसे. एके दिवशी जिम शेजारील बंगल्याच्या गार्डनमध्ये गिटार वादन करणाºया काही मुलांना पहिले. नित्यनियमाने ते पाहण्यासाठी जात असे. मात्र तिथे असलेला सुरक्षारक्षक हाकलून देत असे. जिममध्ये होणारा अपमान आणि सुरक्षारक्षकाचे हाकलून देणं हे अंगवळणी पडले होते. दररोज होणारी ही अवहेलना मित्र,, शेजारी यांच्या चेष्टेचाही विषय ठरत होता. पण एकमेव ती व्यक्ती अशी होती की ती त्याच्याशी प्रेमाने बोलत असे हाच काहीसा त्याच्या बाजूने पडणारा नशिबाचा कौल. . बाकी सगळे फासे तसे आयुष्यात उलटेच.. मात्र त्यातही त्याच्या कानात बंगल्यात वाजणाऱ्या गीताचे सूर नेहमी गुणगुणत असत..
त्याचा निश्चय पक्का होता की एक ना एक दिवस गिटार वाजवणार.. या दृष्टीने मित्र योगेश यादवच्या मदतीने कलासची चौकशी केली. त्यांनतर गिटार वादनाचा प्रवास सुरु झाला. सगळे काही सुरळीत असताना सफाईकामगार असल्याचे आणि शाळा शिकत नसल्याचे प्रेयसीला समजले. मला समजून घेणारी अशी ती एकच होती की, जिच्यामुळे जीवन जगण्याचा आनंद मिळत होता. ‘तू झिरो आहेस, तू आयुष्यात काही करू शकत नाहीस’. असे म्हणून तिनेही शेवटी नाकारले. आयुष्याची दिशा सापडली असे वाटत असताना पुन्हा एकदा त्याच्या जीवनाची नौका व्यसन , आत्महत्येच्या विचारांनी हेलकावे खाऊ लागली. त्या काळात गिटार वादनामुळे मनात येणारे वाईट विचार, नैराश्य दूर होण्यास खूप मदत झाली.
एकदा एका चौकात गिटार वादन करत असताना प्रशांत दे नावाच्या बंगाली व्यक्तीने सूर चुकत असल्याचे सांगितले. चूक सांगणारा पहिला तो पुढे गुरुस्थानी संगीताचा गुरु झाला.. तो खूप छान गातो. त्याच्या सल्ल्याने गिटार वादनाचे प्रशिक्षण वर्ग सुरु करण्याचा निर्णय त्याने घेतला. एका विद्यार्थ्यांपासून वर्ग सुरु केलेल्या त्याच्याकडे आज ८० विद्यार्थी असल्याचे तो अभिमानाने सांगतो. सुरुवातीला प्रशांत आणि सुरक्षारक्षकाचे काम करणारा पण उत्तम गाणारा त्रिलोक सिंगच्या सोबतीने हॉटेल, मॉल, रस्त्यावरील चौक, मित्रांच्या कार्यक्रमात स्वत:च्या बँड चा मोफत ‘शो’ तो सादर करायचो, आता मात्र मानधन घेऊन कार्यक्रम करतो...
गिटारच्या प्रशिक्षणानिमित्त सोडून गेलेल्या प्रेयसीचे कमबॅक..
‘तू झिरो आहेस’ असे म्हणून मला नाकारून गेलेली ‘ती’ उच्च शिक्षणासाठी पुण्यात आलेली असताना एक दिवस माझ्याकडे विद्यार्थी म्हणून प्रवेश घेण्यासाठी आली. तेव्हा समजले तिलाही गिटार वादनाची आवड आहे. तिच्या मनात अजूनही झिरो आहे की हिरो हे ओळखण्याच्या भानगडीत न पडता फक्त विद्यार्थी आणि शिक्षक एवढेच नातं जपतोय...सनी पाचर्णे, गिटारवादक