दहा हजार मैलांच्या पुलाची ‘कुंपणापलीकडली’ गोष्ट
By admin | Published: July 2, 2017 01:32 AM2017-07-02T01:32:56+5:302017-07-02T01:32:56+5:30
मराठी साहित्यिक, कलावंत यांचे अमेरिकेतील हक्काचे स्थान म्हणजे दिलीप वि. चित्रे यांचे घर. त्यांचे नुकतेच अमेरिकेत निधन झाले. ‘कुंपणापलीकडचे शेत’ हा
- अपर्णा वेलणकर
मराठी साहित्यिक, कलावंत यांचे अमेरिकेतील हक्काचे स्थान म्हणजे दिलीप वि. चित्रे यांचे घर. त्यांचे नुकतेच अमेरिकेत निधन झाले. ‘कुंपणापलीकडचे शेत’ हा त्यांचा कथासंग्रह व अन्य लिखाणही अतिशय गाजले आहे. त्यांच्याविषयी हा लेख.
...आता अमेरिकेतली मराठी मंडळं गाठून ‘प्रोग्राम’ करायला जाणाऱ्या मुंबै-पुण्याच्या अर्धकच्च्या लेखक-कलावंतांचे कान कोण पकडणार? जे चाललेय ते अजिबात चांगले नाही, अशा स्पष्ट भाषेत कोण सुनावणार? जे नाणे अस्सल-उत्तम वाजणारे असेल, त्याला मऊमऊ दाढीभर-शुभ्र हसून खळखळून प्रेमाने कोण दाद देणार? सातासमुद्रापल्याडहून आलेल्या स्नेहीसोबत्यांना गाडीत घालून स्वत:च्या दुखत्या पाया-पाठीची पर्वा न करता, अमेरिकाभर कोण हिंडवणार? त्यांच्यासाठी गरमागरम चविष्ट पदार्थ आणि तिखट झणझणीत चटण्या-चुटण्या कोण रांधणार? पुस्तके-चित्रे-गाण्यांच्या सळसळत्या गर्दीत मैफल जमवून पहाट फुटेपर्यंत गप्पांची सत्रे कशी बहरणार?
कारण गेली पन्नासाहून अधिक वर्षे अमेरिकेत रंगलेल्या एका अस्सल मराठी मैफिलीचा सदाबहार सूत्रधार आधीच पुढे गेलेल्या बाबूजींच्या, श्रीपुंच्या, पुलं-सुनीताबार्इंच्या वाटेने घाईघाईने रवाना झाला आहे. ही त्यांची घाईघाई आणि गात-खात-नाचत-गप्पा करत सतत इकडे-तिकडे जात असणे हे तसे नेहमीचेच! त्यामुळे मूळ वॉशिंग्टनचे, पण अलीकडेच प्लॉरिडावासी झालेले दिलीप चित्रे गेले म्हणजे, ‘नक्की कुठे गेले?’ असा स्वाभाविक प्रश्न पडलेल्या त्यांच्या जगभरच्या स्नेह्यांना शुक्रवार रात्री-शनिवारच्या पहाटे या प्रश्नाचे भलतेच उत्तर मिळाले. अभद्र उत्तर. ते पुन्हा न परतण्यासाठी ‘गेल्याची’ वार्ता सांगणारे उत्तर.
खरे तर एरवी कुणाला न बधणाऱ्या खट माणसांना रडकुंडीला आणण्यात चित्रे यांचा जन्मभराचा हातखंडा, पण त्यांच्या मृत्यूची वार्ता सगळ्यांनाच हुंदका फुटेल, असा चटका देऊन गेली.
दिलीप वि. चित्रे. मूळ बडोद्याचे. शिक्षणाने आर्किटेक्ट. पुढे शिकायला आणि नोकरी धरायला म्हणून इंग्लंडला गेले आणि तिथून पुढे अमेरिकेत पोहोचले. हे सगळे सत्तरीच्या दशकातल्या रीतीप्रमाणेच झाले. अमेरिकेत नोकरी शोधली. संसार मांडला. जागतिक मंदीच्या काळात जात्या नोकरीचे सूत हातून सुटायची वेळ आली, तेव्हा रात्रीच्या वेळी वॉचमन म्हणूनही काम केले.
- हळूहळू बस्तान बसले.
इथवरची कहाणी इतर अनेकांसारखीच, पण दिलीप चित्रे या मुक्त, हरहुन्नरी माणसाला इथून पुढे अमेरिकेने असे काही हृदयाशी धरले की, पूर्वेचे अस्सल मराठी अस्तर असलेल्या चित्रे यांच्या मना-स्वभावात पश्चिमेने आपलेही रंग मुक्तहस्ते मिसळून दिले... त्या संस्कृतीसंकरातून एक सुंदर, सुरेल मैफल आकाराला आली.
पासपोर्टचा रंग बदलताना गळ्यात आलेला आवंढा गिळून, ‘अमेरिकन’ होण्या-असण्याची आव्हाने पेलणे त्या ‘जागतिकीकरणपूर्व’ काळात किती दुष्कर होते, याची कल्पना आजच्या ‘ग्लोबल’ मनांना येणे कठीणच! चित्रे यांनी त्यांची पत्नी शोभाच्या सोबतीने हा अवघड टप्पा तर निभावलाच, पण अमेरिकन होऊनसुद्धा आपले आणि इतरांचेही ‘मराठीपण’ शोधण्या-जपण्या-वाढविण्याचे मार्गही त्या ‘इंटरनेटपूर्व काळा’त नेटाने हुडकून काढले.
‘लष्कराच्या भाकऱ्या भाजणे’ हा मराठी वाक्प्रचार अख्ख्या जगाच्या पाठीवर कुठे कृतीत उतरला असेल आणि तब्बल पन्नासहून अधिक वर्षे अतीव आनंदाने साजरा झाला असेल, तर तो वॉशिंग्टनमधल्या दिलीप-शोभा चित्रे यांच्या घरी.
सुरुवाती-सुरुवातीला अमेरिकेच्या उपनगरांमध्ये नव्या-नव्या येणाऱ्या कित्येक कोवळ्या मराठी जोडप्यांच्या पहिल्या भाकऱ्या चित्रे यांच्या घरातच तव्यावर पडल्या. पुढे अमेरिकाभरच्या महाराष्ट्र मंडळांचे संसार उभे करण्यापासून खिशात एक डॉलर नसताना, अमेरिकेत चक्क मराठी चित्रपट महोत्सव भरवण्याची सगळी उस्तवार मोठ्या हिकमती लढवून, ज्याने पार पाडली, त्या माणसाचे नाव दिलीप चित्रेच. ‘घाशीराम कोतवाल’चा अख्खा संच अमेरिकाभर प्रयोग करत हिंडला, तेव्हा त्या दौऱ्याचा खर्च वाचविण्यासाठी या सगळ्यांचे गावोगावच्या घरोघरी वार लावून देण्याचे चोख प्लॅनिंग चित्रे यांचे... आणि पाडगावकर-बापट-माडगूळकर-मधुकाका-श्रीपु भागवत अशा कलंदरांतल्या किचकट सारस्वतांना आपापल्या बॅगेत आपापली पुस्तके भरून अमेरिकेत येण्याचे आवतण देण्याची हिंमत करू धजले, तेही चित्रेच!
गीतरामायणाने अमेरिकनांनाही वेड लावणाऱ्या बाबूजींच्या संतापी प्रेमाचे उत्कट किस्से, पाय मुरगळला, म्हणून फुरंगटून बसलेल्या एका हॉट मराठी अभिनेत्रीचे अॅटमबॉम्ब नखरे जिरविल्याच्या मादक कहाण्या, सारस्वतांच्या ‘तीर्थप्राशना’चे रसभरीत अध्याय, अमेरिकेतले यजमान नोकरीवर गेल्याची संधी साधून, त्यांच्या खुल्या बारमधल्या बाटल्या लांबविणाऱ्या- भारतातल्या घरी तासंतास फोन करून बिले फुगविणाऱ्या फुकट्यांच्या कहाण्या... अशा अगणित किश्श्यांनी भरलेली आपली पन्नास-साठ वर्षांची पोतडी खुली करायला घेतली की चित्रे रंगून जात... गप्पांची मोठी बहार उडे आणि ऐकणारा थक्क होई. अशा वेळी वाटे, हे इतके सगळे कधी आणि कसे जमविले असेल या माणसाने?
पण हे इतकेच नव्हते.
अपरिमित कष्ट, अकटोविकटीचे नियोजन, सुधीर फडके यांच्यासारख्या पाहुण्याला गाडीतून नेताना झालेल्या जीवघेण्या अपघातासारख्या संकटांनाही न भिण्याचे भलते धाडस आणि अमेरिकेत मराठी साहित्य-संस्कृतीसाठीचे कार्यक्रम आयोजित करताना, कशालाही हार न जाणारी चिवट वृत्ती... दिलीप चित्रे हे रसायन मोठे विलक्षण होते.
देशाबाहेर राहणाऱ्या मराठी माणसांच्या अनुभवांना मराठी साहित्यात जागा नाही, म्हणून रडकथा गाणारे अनेक होते. पुढाकार घेतला, तो चित्र्यांनी. सत्तरीच्या दशकाच्या उत्तरार्धात म्हणजे, ईमेल-पूर्व काळात त्यांनी एक भलता घाट घातला आणि मोठ्या चिकाटीने तडीला नेला. जगभर पसरू लागलेल्या मराठी माणसांमधले ‘लेखक’ हुडकून त्यांना लिहायला लावून, त्या एकत्रित कथांचा संग्रह त्यांनी संपादित केला, त्या पुस्तकाचे नाव ‘कुंपणापलीकडले शेत’!
- पण कुंपणाच्या पलीकडे एरवी जोमाने वाढणाऱ्या या शेतात रुजत चाललेल्या कृतक सांस्कृतिक अपराधगंडाचं तण खणून काढण्याची हिंंमत करणारा, कुंपणाबाहेरचा पहिला माणूस पुन्हा तोच होता : दिलीप चित्रे!
अमेरिकेत जन्मलेल्या-तिकडेच वाढलेल्या आपल्या मुलांना रामरक्षा येत नाही, म्हणून खंतावलेल्या, युरोप-अमेरिकेत संसार मांडले, तरी मराठीच गाणी, मराठीच संस्कृती, मराठीच वरण-भात आणि मराठीच मूल्यांचा वृथा हट्ट धरून सतत लटकते, अधांतरी आयुष्य जगणाऱ्या कित्येक कुटुंबांना देशांतराच्या समकालीन वास्तवाची रोकडी जाणीव करून देणारे ‘अलीबाबाची हीच गुहा’ हे चित्रे यांनी लिहिलेले नाटक! ‘तुमच्या मुलांना ज्ञानेश्वर-तुकाराम माहिती नसले, म्हणून काही बिघडत नाही. ‘इकडे’ आहात, तर ‘इकडच्यासारखे’ जगा, माहेरची उसनवारी आता फार झाली!’ असे सुनावण्याची हिंमत करून, चित्रे यांनी या नाटकातून ‘अलीबाबाच्या गुहेचे दार आता बंद झाले आहे. परतीचा मार्ग बंद!!’- असे जाहीर ऐलानच करून टाकले... आणि कहर म्हणजे, ‘काय बाई, चातुर्मासातसुद्धा गोमांस खाता का अमेरिकेत?’ म्हणून खऊट शेरेबाजी करणाऱ्या
देशी नातलगांच्या नाकावर टिच्चून मुंबै-पुण्यात या नाटकाचे प्रयोगसुद्धा केले.
चित्र्यांनी काय नाही केले? दहा हजार मैल अंतरावरची दोन जग सहज जोडणारा पूल उभा केला, अतीव उत्कट अनुभवांच्या आभाळाला कवेत घेणाऱ्या कविता लिहिल्या, अनुवाद केले, संपादनं केली, गाणी लिहिली, पत्नीहून अधिक सखी असलेल्या शोभातार्इंच्या लेखनाला खतपाणी घालून वाढविले, प्रवास केले, नातवंडांशी गट्टी जमविली, जगभरचे मित्र जमविले, मैत्र जपले, कुणाकुणासाठी जीव उधळला, पर्वताएवढी उंच माणसे पाहिली आणि क्वचित त्यांच्यातले खुजेपण दिसले, तेव्हा ते नजरेआड करण्याची दिलदारीही दाखवली!
- आता दिलीप चित्रे नाहीत, नसतील, त्यांची आठवण काढण्याचा उत्तम मार्ग म्हणजे, मित्र-मैत्रिणींना एकत्र जमवणे, खाण्या-पिण्याची जय्यत सज्जता करणे, कविता-गाणी-गप्पांची बहार उडवणे आणि सगळ्यांनी मिळून खळखळून हसणे!
- हसता हसता डोळा पाणी आले, तरी ते कुणाला दिसू न देणे!!!