दहीहंडीचे थर २० फुटांपर्यंतच
By admin | Published: November 6, 2014 04:10 AM2014-11-06T04:10:49+5:302014-11-06T04:10:49+5:30
दहीहंडीत २० फुटांपेक्षा अधिक थर नसावेत, यासह उच्च न्यायालयाने या उत्सवावार घातलेले विविध निर्बंध सर्वोच्च न्यायालयानेही कायम केले आहेत़
मुंबई : दहीहंडीत २० फुटांपेक्षा अधिक थर नसावेत, यासह उच्च न्यायालयाने या उत्सवावार घातलेले विविध निर्बंध सर्वोच्च न्यायालयानेही कायम केले आहेत़ त्यामुळे उंच थरांची स्पर्धा लावणाऱ्या आयोजकांना व मंडळांना चांगलीच चपराक लागली आहे़
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात याविषयी दाखल झालेली विशेष अनुमती याचिका निकाली काढली़ त्यात न्या़ अनिल दवे यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाने घातलेले निर्बंध स्थगित केल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आॅगस्टमधील आदेश सविस्तर नमूद केले व त्यापुढे आता ही याचिका निरर्थक ठरत असल्याचे स्पष्ट करीत संबंधित याचिका निकाली काढली़ याने उच्च न्यायालयाचे आदेश कायम झाले की फेटाळण्यात आले, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता़
अखेर यासंदर्भात उच्च न्यायालयातील सरकारी वकील संदीप शिंदे यांच्याशी मंगळवारी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संभ्रम निर्माण करणारा असून तेथील सरकारी वकिलाला याबाबत न्यायालयाकडून खुलासा करण्यास सांगितले जाईल़ मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचे आदेश कायम केले असून बालहक्क आयोगाने दहीहंडीसाठी सुचवलेली बाल वयोमर्यादा रीतसर अध्यादेश जारी करून जाहीर करावी, असे सर्वोच्च न्यायालाचा निकाल सांगत असल्याचे अॅड़ शिंदे यांनी बुधवारी स्पष्ट केले़ त्यामुळे पुढच्या वर्षी दहीहंडी उत्सवात उंच थर लागणार नाहीत़ दहीहंडीविरोधात फौजदारी जनहित याचिका चेंबूरमधील सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी अॅड़ नितीन नेवसे यांच्यामार्फत केली होती़ त्याची दखल घेत न्यायालयाने १८ वर्षांखालील मुलांना गोविंदा पथकात सहभागी करून घेण्यासाठी व २० फुटांच्या वर थरांना मनाई केली होती़ याविरोधात अमित सरैया व विशाल शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका केली होती़ (प्रतिनिधी)