बाप-लेकीला दोरखंडाने बांधून काठ्यांचे फटके
By admin | Published: March 5, 2016 04:11 AM2016-03-05T04:11:10+5:302016-03-05T04:11:10+5:30
स्वत:च्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्यासह संबंधित अल्पवयीन मुलीलाही पाचवडच्या (ता.वाई) गोपाळवस्तीमध्ये दोरखंडाने बांधून सर्वांसमक्ष अमानुषपणे काठ्यांचे फटके मारणाऱ्या
पाचवड (जि.सातारा) : स्वत:च्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्यासह संबंधित अल्पवयीन मुलीलाही पाचवडच्या (ता.वाई) गोपाळवस्तीमध्ये दोरखंडाने बांधून सर्वांसमक्ष अमानुषपणे काठ्यांचे फटके मारणाऱ्या सात पंचांना भुर्इंज पोलिसांनी गजाआड केली आहे. तसेच, ‘त्या’ पित्यालाही बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गोपाळ समाजातील सर्जेराव पवार (रा. पाचवड), शिवाजी पवार (रा. सुरूर), सर्जेराव चव्हाण (रा. भुर्इंज), राजाराम चव्हाण (रा. कडेगाव), जीवन पवार (रा. नागेवाडी, ता. सातारा), दत्तू चव्हाण (रा. जोशी विहीर) आणि अरुण दिलीप जाधव (रा. पेरले, ता. कऱ्हाड) अशी अटक केलेल्या पंचांची नावे आहेत.
गोपाळ समाजातील एक व्यक्ती मूळची कर्नाटकातील असून, तो सध्या सातारा तालुक्यात राहत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची पत्नी मृत झाली. पत्नीच्या निधनानंतर त्याने स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेबाबत त्याने व त्याच्या मुलीने कुठेही वाच्यता केली नाही; परंतु पत्नीचे श्राद्धकार्य करताना आपल्या हातून मोठा अनर्थ झाल्याचा साक्षात्कार त्याला झाला. त्यानंतर त्याने ठिकठिकाणच्या जात प्रमुखांशी संपर्क साधून आपल्या हातून घडलेला हा प्रकार सांगितला.
यावर उपाय म्हणून पाचवड येथील गोपाळ वस्तीत तातडीने सर्वानुमते जातपंचायत बोलावली गेली. शासनाने निर्बंध घातलेले असतानाही या जातपंचायतीमध्ये तो व त्याच्या अल्पवयीन मुलीस सात हजार रुपये दंड, तसेच प्रत्येकी दहा काठ्यांचे फटके मारण्याची शिक्षा ठोठाविण्यात आली. त्याप्रमाणे त्या दोघांना दोरखंडाने बांधून नंतर सर्वांसमक्ष अमानुषपणे काठ्यांनी दहा-दहा फटके मारण्यात आले. यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेला संपूर्ण समाज ही घटना उघड्या डोळ्याने पाहत होता. त्या पिता-पुत्रीने ही शिक्षा निमूटपणे भोगल्यानंतरच त्यांना समाजात सामील करून घेण्यात आले. सचिन भिसे याने गुपचूपपणे या सर्व घटनेचे चित्रीकरण करून त्याची ‘व्हिडिओ क्लिप’ पोलिसांना दिल्यानंतर गुन्हे दाखल झाले. (प्रतिनिधी)
> हमीद दाभोलकर यांची गोपाळवस्तीस भेट
पाचवड येथील गोपाळवस्तीतील घटनास्थळास अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस हमीद दाभोलकर यांनी शुक्रवारी भेट दिली. त्यांनी या घटनेची माहिती घेतली. अशा घटना घडू नयेत म्हणून काय उपाययोजना करता येतील, यासंबंधी भुर्इंजचे सहायक पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्याशी चर्चाही केली.