विरोधी नगरसेवकांना रोखण्यासाठी रणनीती
By admin | Published: March 3, 2017 01:06 AM2017-03-03T01:06:59+5:302017-03-03T01:06:59+5:30
बारामती नगरपालिकेच्या नव्या कारभाऱ्यांकडून कामकाज सुरू झाले.
बारामती : बारामती नगरपालिकेच्या नव्या कारभाऱ्यांकडून कामकाज सुरू झाले. नगरपालिकेच्या हद्दवाढीमुळे दर्जा वाढला आहे. आता एकहाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांमध्ये एकमत असावे, विरोधी चार नगरसेवकांनी कामाचे श्रेय घेऊ नये, यासाठी नवनिर्वाचित सदस्यांना खास नगरपालिकेच्या कायद्याचे प्रशिक्षण देण्यात आले. पाचगणीसारख्या रम्य ठिकाणी दिवसभराचे प्रशिक्षण देण्यात आले.
नुकत्याच झालेल्या जिल्हापरिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला त्यांचा गड राखण्यात यश आले आहे. परंतु तरीही विरोधी नगरसेवकांना कोणतीही संधी मिळू नये यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे.
बारामती नगरपालिकेत जनतेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षा विराजमान झाल्या आहेत. तर ३५ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. चार नगरसेवक विरोधात आहेत. निवडणूक प्रचारकाळात मागील सभागृहात एकमेव सदस्य असलेल्या विरोधी नगरसेवकाकडून कामाचे श्रेय घेतले, असे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेते मंडळींना निदर्शनास आले. त्यामुळे आता बहुमत असताना केलेल्या कामाचे श्रेय पक्षाला आणि स्थानिक पक्षाच्या नगरसेवकाला मिळावे, यासाठी विशेष रणनीती आखली गेली आहे. या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची निवडून आल्यानंतर बैठक पार पडली. त्यानंतर त्यांना पाचगणीला नगरपालिका कायद्यासह सभागृहात मांडण्यात येणारे विषय, त्यावरील अभ्यास आदींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे या पुढच्या काळात चार विरोधी नगरसेवकांना कामाचे श्रेय मिळू नये, यासाठीच प्रयत्न
केले जातील.
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना विविध ठिकाणी मुख्याधिकारी म्हणून काम केलेल्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले. मागच्या रविवारी पार पडलेल्या या प्रशिक्षण शिबिराला नगरपालिकेच्या खातेप्रमुखांना देखील खास आमंत्रण देण्यात आले होते, हे विशेष. (प्रतिनिधी)