‘आधीच्या’ मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढण्याची रणनीती! फडणवीस सरकारमधील कथित गैरव्यवहार सत्ताधारी बाहेर काढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 11:14 AM2021-09-21T11:14:33+5:302021-09-21T11:17:09+5:30
सध्या किरीट सोमय्यांच्या रडारवर असलेले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या बाबतचे सूतोवाच सोमवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केले.
यदु जोशी -
मुंबई : भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील एकेका मंत्र्यांविरुद्ध आरोपांची राळ उठविली असताना आता ठोशास ठोसा उत्तर देण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारमधील कथित घोटाळे बाहेर काढले जातील, अशी शक्यता आहे.
सध्या किरीट सोमय्यांच्या रडारवर असलेले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या बाबतचे सूतोवाच सोमवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केले. चंद्रकांत पाटील बांधकाम मंत्री असताना हायब्रीड एनयूटीचा मोठा घोटाळा झाला. इतरही घोटाळे झाले. आता आम्हालाही त्यांचे घोटाळे बाहेर काढावे लागतील. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना मी हे सांगितले आहे. शांत बसून चालणार नाही. आपल्या सगळ्यांवरच असे आरोप सुरू राहतील. अशावेळी लोकशाही मार्गाने आपल्यालाही आधीची प्रकरणे बाहेर काढावी लागतील, ही हसन मुश्रीफ यांची विधाने या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहेत.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील कथित घोटाळ्यांची चौकशी करण्याचे आदेश जुलै २०२१ मध्येच महाविकास आघाडी सरकारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागास दिले होते व ती चौकशी सुरू आहे. फडणवीस सरकारच्या काळात सुधीर मुनगंटीवार हे वन मंत्री होते आणि त्यांनी ३३ कोटी वृक्ष लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली होती. मात्र, त्यात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी असल्याने विधिमंडळ सदस्यांची एक समिती या तक्रारींची चौकशी सध्या करीत आहे. राज्यमंत्री दत्ता भरणे हे या समितीचे प्रमुख आहेत. सुरू असलेल्या चौकशांना गती देऊन त्यावर कारवाई करणे आणि जुनी काही प्रकरणे समोर आणणे अशी खेळी महाविकास आघाडीकडून खेळली जाऊ शकते.
विधानसभा अध्यक्ष निवडीचे नियम बदलणार?
- विधानसभा अध्यक्षांची निवड गुप्त मतदानाने करण्याचा सध्याचा नियम बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. विधानसभा नियम समितीची बैठक २२ सप्टेंबरला मुंबईत होत असून त्यात या संबंधीची चर्चा होण्याची शक्यता आहे. समितीमध्ये महाविकास आघाडीचे ७ तर भाजपचे संदीप धुर्वे, जयकुमार गोरे आणि सुधीर गाडगीळ हे तीन सदस्य आहेत. भाजपचे चौथे सदस्य गिरीश महाजन निलंबित आहेत.
- विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने व्हावी असा नियम केल्यास अध्यक्षांची निवड महाविकास आघाडीसाठी सोपी होणार आहे. त्या दृष्टीनेच हालचाली सुरू आहेत.
फडणवीस यांचे जवळचे मानले जाणारे एक माजी मंत्री सध्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत. त्यांच्यावर एका आर्थिक घोटाळ्यात कारवाईचा फास आवळला जाऊ शकतो. आणखी एका मोठ्या विषयाचे पुरावे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने तयार ठेवल्याचीही माहिती आहे. ‘बदला घेण्याचे राजकारण खेळायचे नाही’ या भूमिकेतून आम्ही शांत होतो, पण आता विचार करावा लागेल, असे एका ज्येष्ठ मंत्र्यांनी लोकमतला सांगितले.