महाराष्ट्र निवडणुकीत संघानं बनवली रणनीती; कोणकोणत्या मुद्द्यांवर करणार प्रचार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 05:40 PM2024-10-21T17:40:01+5:302024-10-21T17:41:17+5:30
महाराष्ट्राच्या निवडणुकीत संघ आणि भाजप समन्वयाने प्रचाराची रणनीती आखत आहेत.
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं ९९ जणांची पहिली यादी जाहीर करत प्रचारात आघाडी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यातून धडा घेत भाजपाने विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. त्यासाठी आधीपासून संघासोबत समन्वय साधण्यासाठी नागपूरात विविध बैठका घेण्यात आल्या. आता भाजपाच्या विजयासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्याशी निगडीत ३६ संघटना प्रचारात सक्रीय होणार आहेत. त्यात लहान लहान गट बनवून लोकांच्या घरोघरी जाण्यावर भर दिला जाणार आहे. त्यात संघ विचारसरणीचे लोक लोकांना भाजपा नेतृत्वातील महायुतीसाठी मतदान करण्यासाठी आग्रह करणार आहेत.
संघाच्या कार्यकर्त्यांकडून जनमत तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संपर्क अभियान मोहिम सुरू करण्यासाठी काम करण्यात येत आहे. संघाने त्यासाठी त्यांच्या सहकारी संघटना आणि त्यांच्या समन्वयकांशी चर्चा सुरू केली आहे. संघाचे सहकारी संघटना विविधरित्या महाराष्ट्रात महायुतीच्या विजयासाठी प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्रातील विविध भागांत त्यासाठी बैठका, सभांचे आयोजन केले आहे. ७-८ जणांचा गट बनवून लोकांच्या घराघरापर्यंत पोहचण्यात येईल. त्यात राष्ट्रीय हित, हिंदुत्व, सुशासन, विकास आणि लोककल्याणकारी योजना यासह विविध मुद्दे पटवून देत त्यावर चर्चा करत लोकांचं मतपरिवर्तन करण्यासाठी काम केले जाणार आहे.
१०० टक्के मतदान वाढवण्यावर भर
विश्व हिंदू परिषदेने संपूर्ण महाराष्ट्रात साधू संताचे संमेलन घेणे सुरू केले आहे. मंदिरातील प्रतिष्ठित साधु संत हिंदुत्व, विकास आणि उत्तम प्रशासन यावर लोकांशी चर्चा करतील. त्याशिवाय व्होट जिहादविरोधात १०० टक्के मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. जो हिंदू हिताचे बोलेल त्याला सत्तेवर आणावे यासाठी मतदानाची टक्केवारी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. हिंदू मतांना एकजूट करून महायुतीच्या मागे ताकद उभी करण्याचं काम या मोहिमेतून केले जाईल. नागपूर, अकोला इथं अलीकडेच २ संत संमेलन आयोजित करण्यात आली. त्याप्रकारे महाराष्ट्राच्या इतर भागातही ही संमलने होतील.
हिंदू धर्माच्या रक्षणाचं बोलेल त्याला मत देण्याचं आवाहन
विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा प्रमुख गोविंद शेंडे यांनी सांगितले की, जो कुणी उमेदवार निवडून येणार असेल त्याने धर्माचे रक्षण करावे. समाजासाठी त्याने काम करावे. पुढील कोणत्याही निवडणुकीत आज महाराष्ट्रात आहे, उद्या अन्य राज्यात असेल अशा लोकांना निवडलं पाहिजे जे हिंदू धर्म, संस्कृती आणि प्रथा परंपरा याचं जतन आणि रक्षण करेल असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, व्होट जिहाद हा चिंतेचा विषय आहे. जमीन जिहाद, लव्ह जिहाद, पाणी जिहाद हेदेखील येणाऱ्या काळात होतील. सरकारमध्ये धोरण ठरवणारे हिंदू विचारांचे असावेत. ते व्होट जिहाद करत असतील तर आपण १०० टक्के मतदान का करू नये, लोकसभेला अनेक भागात एकगठ्ठा समाजाचं मतदान एका बाजूला होत असेल तर आम्हालाही ते दाखवून द्यावे लागेल. त्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात, बैठका घ्यावा लागतात. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत असं गोविंद शेंडे यांनी सांगितले.