BRS ची रणनीती! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दुप्पट दराने कांदा खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 05:06 PM2023-06-13T17:06:15+5:302023-06-13T17:07:21+5:30
महाराष्ट्रातील कांदा हैदराबाद, तेलंगणा याठिकाणी विक्री केला जात आहे
नाशिक - कांद्याला भाव नाही म्हणून अनेकदा शेतकरी रडकुंडीला आल्याचे चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळाले आहे. परंतु याच शेतकऱ्यांच्या मदतीला आता तेलंगणा सरकार धावून आले आहे. नाशिकच्या लासलगाव इथं कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. याठिकाणाहून तेलंगणा सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत म्हणून कांद्याची मोठ्या दराने खरेदी केली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना खुश करण्याची रणनीती आखली आहे.
लासलगाव इथं कांद्याचे लिलाव झाल्यानंतर देशभरात कांद्याचे भाव ठरतात. महाराष्ट्रातील कांदा हैदराबाद, तेलंगणा याठिकाणी विक्री केला जात आहे. शेतकऱ्यांकडून २ हजार रुपये दराने हा कांदा खरेदी केला जात आहे. लासलगाव बाजार समितीत ७००-९०० रुपये कांद्याला भाव मिळत होता. मात्र तेलंगणातील बीआरएस पक्षाने महाराष्ट्रातील विस्तारासाठी रणनीती आखली असून अबकी बार किसान सरकार हा नारा दिला आहे.
त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला कांदा दरात आता मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी हात घातला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव कसा मिळेल यादृष्टीने बीआरएस पक्ष कामाला लागला आहे. परंतु मुख्यमंत्री राव यांच्या रणनीतीने राज्यातील भाजपा-शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी जे कांदा उत्पादकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत होते त्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील शेतकरी कांदा रस्त्यावर फेकत होते, त्यांना बीआरएस पक्षाने शब्द दिला होता कांदा फेकू नका, आम्ही तो विकत घेऊ, हा शब्द खरा ठरलाय, जो कांदा फेकून देत होतो त्याला चढ्या दराने भाव मिळाला आहे. राज्यातील पुढारी नालायक आहेत. शेतकऱ्यांशी त्यांचे देणेघेणे नाही. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखऱ राव यांनी पुढाकार घेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे अशी प्रतिक्रिया बीआरएस पक्षाचे नेते माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली आहे.