जगण्याचे बळ !

By admin | Published: August 14, 2016 02:56 AM2016-08-14T02:56:35+5:302016-08-14T02:56:35+5:30

गतिमंद म्हणून जन्माला येणे हा ‘त्या’ मुलांचा दोष नसतो आणि पालकांचाही. मात्र अशा मुलांचे समाजात वावरताना सातत्याने मानसिक खच्चीकरण होत असते. तरीदेखील ही मुले जगत असतात.

Strength of survival! | जगण्याचे बळ !

जगण्याचे बळ !

Next

- सागर नेवरेकर

गतिमंद म्हणून जन्माला येणे हा ‘त्या’ मुलांचा दोष नसतो आणि पालकांचाही. मात्र अशा मुलांचे समाजात वावरताना सातत्याने मानसिक खच्चीकरण होत असते. तरीदेखील ही मुले जगत असतात. धडपडत असतात. अशा मुलांंना जगण्याचे बळ देण्याचे काम करणारे अनेक लोक आहेत. मात्र त्यांच्यापेक्षा वेगळी अशी छाप ‘उमंग चाइल्ड ट्रस्ट’ने पाडली आहे. एक पैसाही न घेता गतिमंद मुलांचे आयुष्य खऱ्या अर्थाने सार्थकी लावणाऱ्या उमंगचा प्रवास ‘सलोनी’मुळे सुरू झाला. आणि आजघडीला मैलाचा दगड पार करणारी ही ट्रस्ट तब्बल ५८ गतिमंद मुलांचे आयुष्य सार्थकी लावण्यासाठी काम करते आहे.
उमंग चाइल्ड ट्रस्टच्या अध्यक्षा अश्विनी कराडे यांच्या मुलीला सलोनीलाही असाच काहीसा त्रास होता. जन्मावेळी सलोनीच्या मेंदूला काहीशी हानी झाली. त्यामुळे ती चालेल, बोलेल का? असे अनेक प्रश्न साहजिकच तिच्या कुटुंबीयांसह डॉक्टरांना पडले. यावर उपाय म्हणून डॉक्टरांनी व्यायाम हा पर्याय सांगितला आणि मग सलोनीवर वेगवेगळ्या थेरपी सुरू करण्यात आल्या. ३ महिन्यांपासून तिच्यावर थेरपी सुरू करण्यात आली. तिला व्यायाम शिकवण्यात येऊ लागले. पाच वर्षांनी सलोनीमध्ये फरक जाणवू लागला. इयत्ता चौथी-पाचवीत असताना तिच्यात बऱ्यापैकी सुधारणा झाली. ती चालू लागली, बोलू लागली. त्यामुळे तिच्या बरोबरच्या मुलांच्या पालकांनी सलोनीची आई अश्विनी यांच्याकडे याबाबत विचारणा केली. यावर अश्विनी यांनी या गोष्टी कथन करतानाच सलोनीसारख्या इतर मुलांचाही विचार केला आणि घरच्या घरी गतिमंद मुलांसाठी सेशन्स घेण्यात सुरुवात केली.
सेरेब्रल पाल्सी म्हणजे शारीरिक अपंगत्व, मतिमंद, गतिमंद, लर्निंग डिसेबल, आॅटिझम, डाऊन सिंड्रोम हायपर अ‍ॅक्टिव्हिटी अशा अनेक कारणांमुळे मुलांमध्ये मानसिक, शारीरिक विकलांगता येते. या मुलांना जर वेळीच चांगली ट्रीटमेंट दिली तर ही मुले स्वत: जगू शकतात, ही जाणीव त्यांच्यात निर्माण होते. अशा मुलांची ट्रीटमेंट ही विविध पातळ्यांवर चालते. काऊन्सिलिंग, फिजिओथेरपी, आॅक्युपेशनल थेरपी, स्पीचथेरपी, स्पेशल एज्युकेशन या प्रत्येक ट्रीटमेंटसाठी वेगवेगळे सेंटर असतात. एक ट्रीटमेंट झाली की, दुसऱ्या ट्रीटमेंटसाठी दुसऱ्या ठिकाणी पायपीट करावी लागते. मात्र त्यामुळे पैसा आणि वेळ या दोन्ही गोष्टी खर्च होतात. यावर उपाय म्हणून मग अश्विनी कराडे यांनी ‘उमंग चाइल्ड ट्रस्ट’ स्थापन केली. आणि यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी एकाच छताखाली आणल्या.
समाज व्यवस्था या मुलांकडे एका वेगळ्या नजरेने पाहते. संबंधितांना ही मुले ‘वेडी’ आहेत असे वाटते. मात्र या मुलांमध्येही आयक्यू लेव्हल असते. फक्त त्याचे प्रमाण कमी असते आणि त्यांना त्या लेव्हलनुसार शिकवले जात नाही. या सगळ्याचा विचार ट्रस्टने केला. पण हे शिकवायचे म्हणजे ते आपणालाही यायला हवे याचा विचार करत अश्विनी यांनी ‘डिप्लोमा इन लर्निंग डिसेअ‍ॅबिलिटी’, ‘सर्टिफिकेट कोर्स इन आॅटिझम’ स्पेशल एज्युकेशनचे कोर्स केले. पाहता पाहता हा प्रवास मोठा झाला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांसाठी ट्रस्टने मोफत उपचार देण्यास सुरुवात केली. आता तर गतिमंद मुलांच्या पालकांच्याही समुपदेशनाचे काम ट्रस्टकडून केले जाते आहे.
उमंगचा श्रीगणेशा झाला तेव्हा त्यांच्याकडे केवळ पाच ते दहा गतिमंद मुले होती. त्यांना प्रशिक्षण दिले जात होते. आता या मुलांचा आकडा तब्बल ५८ झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे काम करण्यासाठी ट्रस्टला अनुदान मिळत नाही. शिवाय त्यांचे काम भाड्याच्या जागेवर चालते. हा सर्व खर्च ट्रस्टचे सहकारी मिळून करतात. इवल्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. मात्र हे काम सोपे नाही. गतिमंद मुलांचे आयुष्य ‘सोनरी’ करण्यासाठी आजही हा ट्रस्ट झगडतो आहे. सलोनीच्या निमित्ताने हा प्रवास सुरू झाला असला तरी अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे.

Web Title: Strength of survival!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.