ठाकरे गटाला बळ, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी हाती बांधलं शिवबंधन, उद्धव ठाकरे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 05:29 PM2024-03-11T17:29:23+5:302024-03-11T17:30:03+5:30
Chandrahar Patil News: लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटाला पश्चिम महाराष्ट्रातून मोठं बळ मिळालं आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेले प्रख्यात कुस्तीपटू आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आज हाती शिवबंधन बांधत ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटाला पश्चिम महाराष्ट्रातून मोठं बळ मिळालं आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेले प्रख्यात कुस्तीपटू आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आज हाती शिवबंधन बांधत ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. चंद्रहार पाटील हे आज त्यांच्या हजारो समर्थकांसह उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या मातोश्री येथे आले होते. तिथे उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्या हातात शिवबंधन बांधले आणि त्यांच्या गळ्यात शिवसेनेची भगवी शाल आणि भगवा ध्वज देत त्यांच्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची अधिकृत घोषणा केली.
चंद्रहार पाटील यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, आज माझी छाती अभिमानाने फुलून आली आहे. छाती किती इंच झाली हे काही मी सांगू शकत नाही. कारण या मर्दाची छाती पाहिल्यानंतर सांगलीत आमच्याशी लढण्याची हिंमत होणार नाही. सध्या पक्षातून पळपुटे नामर्द पळून जात आहेत. पण मर्द शिवसेनेत येत आहेत. शिवसेना ही मर्दांची संघटना आहे. मला लहानपणीचे दिवस आठवले. त्यावेळी मारुती माने हे मातोश्रीवर यायचे. बाळासाहेबांशी बोलायचे तीच परंपरा अजूनही सुरू आहे.
#WATCH | Mumbai: Double Maharashtra Kesari Chandrahar Patil joins Shiv Sena (UBT) in the presence of former Maharashtra CM Uddhav Thackeray, at Matoshree. pic.twitter.com/0G7Yvecey3
— ANI (@ANI) March 11, 2024
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, चंद्रहारजी तुमचं शिवसेनेमध्ये स्वागत आहे. त्यांनी अशी विनंती केली होती की उद्धवजी तुम्ही काही तरी संकेत द्या. आता संकेत काय देणार लोकांनी ठरवलंच आहे, त्याला मी आता काय करणार. जनतेने एकदा संकेत दिल्यावर त्या पलिकडे काय संकेत द्यायचे. गदा आणि मशाल ह्या मर्दाच्या हातात शोभतात. आता ही गदा आणि मशाल हातात घेऊन आपल्याला सांगलीतून एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे. आता मी काही जास्त बोलणार नाही. कारण बरीच वर्षे मी सांगतील आलेलो नाही आहे. आता येणार, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिले.