राज्याची पुरोगामी विचारधारा बळकट करा
By Admin | Published: August 11, 2014 03:09 AM2014-08-11T03:09:07+5:302014-08-11T03:11:05+5:30
लोकसभेच्या निवडणुकीनंतर मोदी सरकारविषयी भ्रमनिरास झाल्याने राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पुन्हा जोमाने उठून उभा राहिला आहे
पुणे : लोकसभेच्या निवडणुकीनंतर मोदी सरकारविषयी भ्रमनिरास झाल्याने राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पुन्हा जोमाने उठून उभा राहिला
आहे. जातीयवादी शक्तींशी मुकाबला करायचा असेल तर राष्ट्रवादीला आगामी निवडणुकांमध्ये साथ द्या, जेणे करुन महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा बळकट होईल, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. देशात दुसरी हरितक्रांती ही शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळे झाली़ शेतकऱ्यांच्या घामाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम केंद्रात त्यांनी तर राज्यात अजित पवार यांनी केले़ आज देशात १ वर्ष पुरेल इतका धान्यसाठा आहे, असे सांगणारे केंद्रीय मंत्री पासवान हे सांगायला विसरतात की शरद पवार हे केंद्रीय कृषीमंत्री असताना शक्य
झाले आहे, असेही तटकरे म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
तुम्ही म्हणाल त्याला उमेदवारी मिळेल असे नाही. ज्याला मिळेल त्याचे काम इमानदारीत करा, असे आवाहन अजित पवार यांनी केले. दिवसा एक आणि रात्री एक काम करू नका, अशा कानपिचक्याही दिल्या. सभास्थानी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. तो धागा पकडून पवार यांनी केवळ माझ्यासमोर गर्दी करू नका. मी गेलो की सारे शांत असे होऊ देऊ नका. अशीच गर्दी शेवटपर्यंत टिकली पाहिजे, असे सांगून ते म्हणाले की, मी चुकलो होतो, म्हणून आता तोलूनमापून बोलतो आहे. परत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसमोर एक दिवस मला घालवायचा नाही.