सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करा

By admin | Published: March 3, 2017 03:18 AM2017-03-03T03:18:09+5:302017-03-03T03:18:09+5:30

लोकांच्या निवासाकरिता जागा उपलब्ध करून देणे, त्यांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे महापालिकेला प्रयत्न करावे लागतील

Strengthen the public transport system | सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करा

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करा

Next


ठाणे - ठाणे शहर आता वाढत आहे. येथील मूळ लोकसंख्या आणि बाहेरून आलेल्या लोकांच्या निवासाकरिता जागा उपलब्ध करून देणे, त्यांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे महापालिकेला प्रयत्न करावे लागतील. मात्र, ठाण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या समस्या सोडवून ती मजबूत करणे, याला सर्वप्रथम प्राधान्य द्यायला हवे, असे मत ठाणे महापालिकेचे माजी नगरअभियंता के.डी. लाला यांनी ‘लोकमत’शीबोलताना व्यक्त केले.
लाला म्हणतात की, शहराच्या कोणत्याही फुटपाथवरून चालणे आज कठीण झालेले असून शहरासाठी स्ट्रीमलेस फुटपाथची आवश्यकता आहे. रस्ते मोठे होत आहेत, ही चांगली बाब आहे. परंतु, रस्ते मोठे होत असताना पार्किंगची समस्या सुटलेली नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजंूना होत असलेल्या पार्किंगमुळे वाहतूककोंडीची समस्या वाढत आहे. त्यामुळे पार्किंग धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. ठाणे पूर्वसाठी सॅटीसचा जो प्रकल्प हाती घेतला आहे, तो मार्गी लागणे गरजेचे असून यामुळे पूर्व आणि पश्चिम जोडले गेले, तर त्याचा फायदा नागरिकांना होणार आहे.
ठाण्यात प्रवेश झाला की, वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे कोपरी ब्रिजचे कामही जेवढ्या लवकर मार्गी लागेल, तेवढे ते पालिकेने लक्ष घालून पूर्ण करणे गरजेचे आहे. ठाणेकरांना फिरण्यासाठी शहरात केवळ मॉल उपलब्ध आहेत किंबहुना बाहेरून येणाऱ्यांसाठी ठाण्यात फिरण्यासारखी ठिकाणेच नाहीत. पालिकेने असे काही स्पॉट विकसित करावेत, जेणेकरून बाहेरून येणाऱ्या व्यक्तीच्या हाती ठाण्याचे गाइड असेल आणि तो सांगेल की, हे ठिकाण फिरण्यासाठी चांगले आहे. अशा पद्धतीने काही मोठे प्रकल्प हाती घेऊन ठाण्याला एक वेगळी ओळख देणे गरजेचे ठरले आहे. अर्थसंकल्पात या कामांना प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे लाला म्हणाले.
ठाणे शहराचा विकास करताना कोणते प्रकल्प हाती घेतले, तर ते फायदेशीर ठरतील, कोणते कुचकामी ठरतील, याचा अभ्यास करण्यासाठी एक तज्ज्ञांची समिती नेमून त्यांच्याकडून अहवाल तयार करून घेतल्यास ठाणेकरांच्या पैशांची उधळपट्टी होणार नाही, असे लाला म्हणाले.
तरुणांसाठी खेळाची मैदाने उपलब्ध करून देतानाच शहरात अशी काही गार्डन विकसित केली पाहिजेत, ज्या ठिकाणी नागरिकांना विरंगुळा लाभेल. मागील काही वर्षांत ध्वनी, वायुप्रदूषण वाढले आहे. यावर उपाय करणे गरजेचे आहे. यासाठी बजेटमध्ये तरतूद करणे गरजेचे आहे.
नगरसेवकांनी आपला निधी खर्च करताना केवळ गटार, पायवाटांच्या कामाला प्राधान्य न देता सोशल मीडियाचा वापर अधिक करणे गरजेचे आहे. नगरसेवकाला आपल्या प्रभागात एखादे काम करायचे झाल्यास त्याने ते सोशल मीडियावर टाकून आपल्या प्रभागातील नागरिकांच्या सूचना घ्याव्यात. यामुळे निधीचा दुरुपयोग टाळता येईल. स्मार्टसिटीच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने वायफाय, सीसीटीव्ही कॅमेरे, वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट आदींसह इतर महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करावे, याकडे लाला यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)
>ठाणेकरांना काय हवे?
पुनर्वसनाचा मुद्दा मागील कित्येक वर्षांपासून श्रीरंग, वृंदावनमध्ये गाजत आहे. परंतु, त्या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाही. नगरसेवकाने आपला वैयक्तिक स्वार्थ बाजूला सारून इमारतींच्या पुनर्वसनाकडे लक्ष दिले, तर कोणीही पुनर्विकास रोखू शकणार नाही. रिक्षांकडून होणारी लूट आणि काही ठिकाणी न जाण्याची सुरू असलेली मनमानीही मोडीत काढणे गरजेचे आहे. आयुक्तांनी सुरू केलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.
- चंद्रहास तावडे, प्रभाग क्रमांक ११आमचा प्रभाग क्रमांक २६ मध्ये गटार, पायवाटा या काही समस्या नाहीत. परंतु, येथील रस्ते अरुंद आहेत, रस्त्याच्या आजूबाजूला कुठेही पागीची सुविधा नाही. त्यात होणारी वाहतूककोंडी यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे येथे पार्किंग झोन तयार करण्यासाठी नगरसेवकांनी व पालिका प्रशासनाने प्रयत्न करावेत. पाण्याची समस्या असून येथे नवीन वाहिन्या टाकून ती सोडवण्यावर भर दिल्यास बरे होईल.
- अ‍ॅड. प्रतीक पवार,
प्रभाग क्रमांक २६आमच्या प्रभागात कुठेही उद्यान नाही, उद्यानासाठी येथील एक ठिकाण मागील कित्येक वर्षांपासून आरक्षित आहे. परंतु, त्या ठिकाणी अद्यापही उद्यान होऊ शकलेले नाही. नगरसेवकाने आणि पालिकेने नेप्रो कंपनीमधील या आरक्षित भूखंडाकडे लक्ष देऊन उद्यानाची ही समस्या सोडवल्यास येथील आबालवृद्धांना फायदा होणार आहे. याशिवाय, रस्त्यांवर अर्ध्यापर्यंत एलईडी दिवे लावण्यात आले आहेत. ते सर्व प्रभागांत लावण्याकडे नगरसेवकाने लक्ष द्यावे.
- दिनेश पाटील, प्रभाग क्रमांक ३
>विटावा भागात समस्या खूप आहेत. गटारे, पायवाटांच्या समस्या आहेतच, परंतु येथील स्मशानभूमीची अवस्था दयनीय झाली असून ती सुधारण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. दाटीवाटीने लोकवस्ती असल्याने या भागातील रस्तेही अरुंद आहेत. परंतु, या भागात एखादे उद्यान झाल्यास त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. - निकिता जालगावकर, प्रभाग क्रमांक २४
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नगरसेवक निधीतून करण्याची कामे आणि अर्थसंकल्पी तरतुदीतून करायची कामे, याबाबत शहरातील सुज्ञ नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत. आयुक्तांच्या या आवाहनाला प्रतिसाद देणे, हे प्रत्येक ठाणेकराचे कर्तव्य आहे. पुढील १० दिवसांत ठाणे रेल्वे स्थानक, प्रमुख चौक येथे महापालिका सूचनापेट्या बसवणार आहे. त्यात प्रत्येक नागरिकाने सूचना द्याव्या, असे आवाहन ‘लोकमत’ आपल्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ या उपक्रमांतर्गत करीत आहे. त्यासाठी ही विशेष मोहीम...
>ठाणे... स्मार्ट होण्याच्या वाटेवरचे वेगाने विस्तारणारे शहर. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहराची सामाजिक वीण जितकी भिन्न, तितकीच सुविधांची गरजही मोठी. प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षाही सतत बदलणाऱ्या. त्या समजून घेत त्यांचा अर्थसंकल्पात समावेश केला जाणार आहे. नगरसेवकांचा निधीही नेमक्या कारणांसाठी खर्च व्हावा; पालिकेच्या विकासकामांशी त्याची सांगड घातली जावी, असाही प्रयत्न आहे. जबाबदार ठाणेकर म्हणून आता आपण त्याला प्रतिसाद देण्याची गरज आहे. आपल्या अपेक्षा, सूचना पालिकेला सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी ‘लोकमत’ही तज्ज्ञांच्या सूचना, नागरिकांच्या अपेक्षा मांडणार आहे. त्याही दिशादर्शक ठरतील! चला, ठाणे स्मार्ट करण्यासाठी आपणही पुढाकार घेऊ...

Web Title: Strengthen the public transport system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.