जलसंवर्धनाची लोकचळवळ उभारावी
By Admin | Published: April 21, 2016 05:00 AM2016-04-21T05:00:57+5:302016-04-21T05:00:57+5:30
राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रशासनाबरोबरच जनतेचा सहभाग मोलाचा आहे. पुढील काळात प्रशासन व नागरिकांनी हातात हात घालून जलसंवर्धनाची चळवळ लोकचळवळ म्हणून उभी करावी
अमरावती : राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रशासनाबरोबरच जनतेचा सहभाग मोलाचा आहे. पुढील काळात प्रशासन व नागरिकांनी हातात हात घालून जलसंवर्धनाची चळवळ लोकचळवळ म्हणून उभी करावी, असे प्रतिपादन सिनेअभिनेता आमीर खान यांनी केले.
पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१६’ निमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमीर खान यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील बचत भवनात प्रबोधन सत्र आयोजिण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. अनिल बोंडे, पाणी फाऊंडेशनचे सदस्य सत्यजित भटकळ, अविनाश पोळ, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
आमीर खान म्हणाले, आम्ही पाणी फाऊंडेशनच्या वतीने बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुका अशा तीन तालुक्यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.. याद्वारे आम्ही लोकांपर्यंत पोहोचू इच्छितो. पुढील वर्षी ३० तालुक्यांत तर त्या पुढीलवर्षी ३०० तालुक्यांत असे करून पुढील ४-५ वर्षांत संपूर्ण राज्यात ही स्पर्धा घेण्यात येईल. सर्व गावांनी स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)