टंचाईग्रस्त गावातील जलस्त्रोत होणार बळकट
By admin | Published: February 25, 2015 02:04 AM2015-02-25T02:04:02+5:302015-02-25T02:04:02+5:30
जलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या व महसूल विभागाने ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर केलेल्या टंचाईग्रस्त गावांमधील जलस्त्रोतांची दुरुस्ती
जितेंद्र दखणे, अमरावती
जलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या व महसूल विभागाने ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर केलेल्या टंचाईग्रस्त गावांमधील जलस्त्रोतांची दुरुस्ती, बळकटीकरण केले जाणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना (आरकेव्हीवाय) महात्मा फुले जल आणि भूमी संधारण अभियानातून राज्यासाठी पन्नास कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या अभियानांतर्गत पाझर तलाव, माती नाला बांध, सिमेंट नालाबांध, पिण्याचे पाण्याचे स्त्रोत यांचे बळकटीकरण, विहीर पुनर्भरण, गाळ काढणे, खोल सलग समपातळी चर ही कामे प्राधान्याने केली जाणार आहेत.
त्यानुसार टंचाईग्रस्त गावातील पाझर तलाव, गाव तलाव, साठवण तलाव, शिवकालीन, ब्रिटिशकालीन निजामकालीन ऐतिहासिक तलावातील गाळ लोकसहभागातून काढला जाईल़ ज्या ठिकाणी लोकसहभाग मिळणार नाही त्या ठिकाणी गाळ काढण्यासाठी यंत्राचा वापर करुन फक्त डिझेलसाठी निधी दिला जाईल. पाणलोट क्षेत्रात दुरुस्तीसाठी जलस्त्रोत नसल्यास तेथे डोंगर उतारावर खोल सलग समपातळी चर खोदण्यात येईल. जलयुक्त अभियानाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी कार्यशाळा, सरपंच मेळावे, दिंडी, पथनाट्य, शालेय स्पर्धा घेतली जाणार आहे़ भित्तीपत्रके, चित्रफिती, संदेशातून लोकसहभाग वाढविण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे.