श्रीरामपूर येथे २ गटात तणाव; जमावाकडून दुकानांची तोडफोड
By admin | Published: May 9, 2016 05:31 AM2016-05-09T05:31:34+5:302016-05-09T05:34:22+5:30
श्रीरामपूर येथे रवीवारी रात्री ११:३० च्या सुमारास किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणातून दोन गटात दंगल भडकली. त्यानंतर शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ व दगडफेक झाली.
Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. ९ : श्रीरामपूर येथे रवीवारी रात्री ११:३० च्या सुमारास किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणातून दोन गटात दंगल भडकली. त्यानंतर शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ व दगडफेक झाली. नेवासा-संगमनेर रस्त्यावर असलेल्या नेहरु भाजी मार्केट समोरील फळविक्रेत्यांची १० ते १५ दुकाने दंगलखोरांनी पेटवून दिली. त्याचप्रमाणे पुण-तांबा रस्त्यावरील सयद्द बाबा दर्ग्याजवळील केवल किराणा, गौतम किराणा, प्रसाद शॉपसारखी फोडून लुटण्यात आली.तसेच तेथिल काही वाहनांना व इतरही दुकानांना आगी लावण्यात आल्या. शहराच्या प्रभाग क्रमांक १ व २ मध्ये घडलेल्या जाळपोळीचे पडसाद शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी रोड व इतर परीसरातही उमटले.
शिवाजी रोडवर असणाऱ्या २ टपऱ्या दंगेलखोरांनी जाळल्या. सय्यद बाबा दर्गा परीसरात मोठा जमाव जमल्याने आग विजवण्यासाठी आलेल्या अग्निशामक बंबाना विजवण्यासाठी घटनास्थळी जाण्यास अडचणी येत होत्या.
श्रीरामपुरचे अप्पर पोलीस अधिक्षक संजय जाधव रजेवर आहेत त्यामुळे त्यांचा अतिरिक्त पदभार अहमदनगर येथिल अप्पर पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्याकडे आहे. घटनेची माहीती कळताच अहमदनगर येथून देशमुख दंगल नियंत्रक पथक व ज्यादा पालीस फोर्स घेऊन श्रीरामपूरमध्ये दाखल झाले. दरम्यान, श्रीरामपुरचे उपविभागीय दंडाधिकारी प्रकाश थवील, तहसीलदार किशेर कदम, पोलीस निरीक्षक राजेंद्र पडवळ आणि उपनिरीक्षक सुधीर पाटील यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. रात्री उशीरा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात पोलीसांना यश मिळाले.