शिवसेना-भाजपा युतीमध्येही तणाव
By admin | Published: August 29, 2014 03:44 AM2014-08-29T03:44:25+5:302014-08-29T03:44:25+5:30
हरियाणा जनहित काँग्रेसने भाजपासोबतची आपली युती तोडली असतानाच महाराष्ट्रातही युती तोडण्याची मागणी शिवसैनिकांमध्ये जोर धरू लागली आहे. दिवसभर अनेक शिवसैनिकांमध्ये व्हॉटसअॅपवर याचीच चर्चा सुरू होती.
संदीप प्रधान, मुंबई
हरियाणा जनहित काँग्रेसने भाजपासोबतची आपली युती तोडली असतानाच महाराष्ट्रातही युती तोडण्याची मागणी शिवसैनिकांमध्ये जोर धरू लागली आहे. दिवसभर अनेक शिवसैनिकांमध्ये व्हॉटसअॅपवर याचीच चर्चा सुरू होती. भाजपाची दादागिरी यापुढे क्षणभरही सहन न करता स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भाषा शिवसैनिक करीत होते.
लोकसभा निवडणुकीतील विजयापासून भाजपा महाराष्ट्रात बिग ब्रदरच्या भूमिकेत जाऊ पाहात आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून ते एकदाही मातोश्रीवर पायधूळ झाडायला गेले नाहीत व भविष्यातही जाणार नाहीत हे भाजपाचे नेते अभिमानाने खासगीत सांगतात. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या १८ जागा हा केवळ मोदींच्या करिष्म्याचा चमत्कार आहे, असे भाजपा नेते खासगी गप्पांत बोेलतात. याची शिवसैनिकांना जाणीव आहे. जागावाटपाबाबत अलीकडे पुण्यात झालेल्या बैठकीत शिवसेनेला निमंत्रित केले नव्हते. योगायोगाने शिवसेना नेते दिवाकर रावते हे एका विवाह सोेहळ्याकरिता पुण्यात गेले होते. त्यामुळे त्यांना बळेबळे चर्चेत सहभागी करून घेण्यात आले. महायुतीमधील घटकपक्षांची जागावाटपाबाबत भाजपाशी चर्चा झाली आहे. मात्र शिवसेनेसोबत चर्चा झाली नसल्याचे घटकपक्षांचे नेते सांगतात. परिणामी शिवसेनेकडील जे मतदारसंघ घटकपक्षांना हवे ते सुटणार किंवा कसे याबाबत अनिश्चितता आहे. त्याचवेळी राज्यात युतीची सत्ता आल्यास सरकार हे भाजपाच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले पाहिजे, असा निर्णय दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ वर्तुळात झाल्याचे गावागावातील भाजपा कार्यकर्ते सांगत फिरत असल्याने शिवसैनिक अस्वस्थ आहेत.
शिवसैनिकांमधील ही अस्वस्थता नेतृत्वाने हेरली असून, राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वार्थाने मातब्बर नेत्यांना शिवसेनेत प्रवेश देण्याचा सपाटा लावला आहे. युती तुटली तर सर्वच्या सर्व २८८ मतदारसंघांत निवडणूक लढविताना समर्थ उमेदवारांची वानवा पडू नये, या दृष्टीने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.