दंगलीतील दोषींवर कठोर कारवाई; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 02:33 PM2023-05-16T14:33:27+5:302023-05-16T14:33:55+5:30
कुणीही कायदा हातात घेऊ नका, सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट टाकताना जबाबदारीने टाका, असे आवाहन मुख्यमंत्र्यानी केले.
मुंबई : अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलींना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिले. सामाजिक सलोखा राखला जाईल, कुणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घेऊन सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
अकोला आणि शेवगाव येथे दंगलींनंतर दोन्ही ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात असून चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी अकोला येथे तर शेवगाव येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भेट देत पाहणी केली आहे.
कुणीही कायदा हातात घेऊ नका, सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट टाकताना जबाबदारीने टाका, असे आवाहन मुख्यमंत्र्यानी केले.
राज्यात जाणूनबुजून दंगली घडविण्याचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस
जाणूनबुजून दंगली घडविण्याचा प्रयत्न होतोय. याला कोणाची तरी फूस आहे. त्यांचा शोध घेऊन सगळे बाहेर आणू, , असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरीत सांगितले.
शेवगाव शहरात तणावपूर्ण शांतता
शेवगाव (जि. अहमदनगर) येथे रविवारी रात्री दोन गटांत झालेली दगडफेक, जाळपोळीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शेवगाव शहरात तणावपूर्ण शांतता होती. याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात ११२ जणांविरोधात गुन्हा दाखल असून, २९ जणांना पाेलिसांनी अटक केली. यात तीन पोलिस व चार होमगार्डसह काही नागरिकही जखमी झाले.
अकोल्यात आणखी १०० जणांना अटक
अकोला - सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे जुने शहरात १२ मे रोजी उशिरा रात्री दोन गटात दगडफेक, जाळपोळसह वाहनांच्या तोडफोडीचा प्रकार घडला होता. या प्रकरणात पोलिसांनी जवळपास १०० जणांना सोमवारी अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.
- जिल्हाधिकाऱ्यांनी जुने शहर, डाबकी रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत १५ मेपासून रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत संचारबंदी कायम ठेवली असून, त्यात थोडी शिथिलता देत, १६ मेपासून जमावबंदी लागू केली आहे.