वीज कर्मचा-यांना मारहाण करणा-यांवर कठोर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 04:05 AM2018-01-22T04:05:33+5:302018-01-22T04:05:51+5:30
वीजबिल थकबाकी वसुलीसाठी जाणा-या महावितरण कंपनीच्या कर्मचा-यांना मारहाण करण्याचे प्रकार राज्यात दिवसेंदिवस वाढत असल्याच्या घटना गांभीर्याने घेत मारहाण करणा-यांविरोधात कठोर पोलीस कारवाई करण्याबाबत आग्रही असल्याचे संकेत महावितरण प्रशासनाने दिले आहेत.
मुंबई : वीजबिल थकबाकी वसुलीसाठी जाणा-या महावितरण कंपनीच्या कर्मचा-यांना मारहाण करण्याचे प्रकार राज्यात दिवसेंदिवस वाढत असल्याच्या घटना गांभीर्याने घेत मारहाण करणा-यांविरोधात कठोर पोलीस कारवाई करण्याबाबत आग्रही असल्याचे संकेत महावितरण प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान, वीज कर्मचा-यांना मारहाण करणा-यांविरोधात गुन्हे नोंदविण्यात येत असून, आरोपीला दोन-तीन वर्षांपर्यंत कैद आणि दंडाची तरतूद आहे.
महावितरण प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वीज कर्मचाºयांना होणाºया मारहाणीच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता महावितरण प्रशासनाने आरोपींना तत्काळ अटक व्हावी आणि कठोर शिक्षा व्हावी याकरिता संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. वीज थकबाकी वसूल करायची नाही, विजेची चोरी पकडायची नाही, गळती थांबवायची नाही, शासकीय सेवा या मोफत वापरायच्या अशा घटना वाढत आहेत. थकबाकी वसूल केल्याशिवाय ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा करणे अशक्य असल्याने अशा पद्धतीने महावितरणचा कारभार कसा चालवायचा, असा प्रश्न महावितरणपुढे निर्माण झाला आहे.
महावितरण कार्यालयांना घेराव घालणे, कर्मचाºयांना कोंडून ठेवणे, तोडफोड-जाळपोळ करणे हे प्रकार होत असतील तर महावितरणच्या अधिकारी-कर्मचाºयांनी काम तरी कसे करायचे, असा प्रश्न कर्मचारी संघटना वारंवार उपस्थित करीत आहेत. उद्दिष्टाप्रमाणे वीज थकबाकी वसूल न झाल्यास वीजपुरवठा करणे अशक्य होईल. तरी वीज ग्राहकांनी महावितरणची बाजूही समजून घेणे आवश्यक आहे. काही थकबाकीदारांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांना मारहाण करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, कार्यालयाची तोडफोड करणे हे प्रकार राज्यात वाढले आहेत, संबंधितांविरुद्ध गुन्हेही दाखल झाले आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.