खोटे कॉल्स करणाऱ्यांवर होणार आता कठोर कारवाई
By admin | Published: February 24, 2016 01:23 AM2016-02-24T01:23:16+5:302016-02-24T01:23:16+5:30
‘मी राधेशाम बोलतोय. दादरला बॉम्ब ठेवला आहे.’ पनवेलला दोन किशोरवयीन मुलांनी १०० क्रमांकावरील फोन फुकटात असल्यामुळे पोलीस नियंत्रण कक्षाला बॉम्ब ठेवल्याचे सांगितले.
- डिप्पी वांकाणी, मुंबई
घटना पहिली : ‘मी राधेशाम बोलतोय. दादरला बॉम्ब ठेवला आहे.’ पनवेलला दोन किशोरवयीन मुलांनी १०० क्रमांकावरील फोन फुकटात असल्यामुळे पोलीस नियंत्रण कक्षाला बॉम्ब ठेवल्याचे सांगितले.
घटना दुसरी : दुबईहून हाफीज रेहमान याने मुंब्य्रात राहणाऱ्या नदीम-श्रावण शेख याने चार जिहादींना घरात आश्रय दिल्याचे पोलिसांना फोन करून सांगितले. कारण काय, तर नदीम-श्रावणच्या चुलत बहिणीशी हाफीज रेहमानच्या लग्नाला त्याचा विरोध होता.
तिसरी घटना : पुणे येथील संजीब मिश्र याची पोलिसांनी नाकाबंदीमध्ये झडती घेतली होती, म्हणून त्याने ओडिशाहून येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा गंमत म्हणून फोन केला.
२०१५ वर्षात आजपर्यंत दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) अशा स्वरूपाचे १४८ फोन (कॉल्स) आले. त्यातील ९० टक्के हे गंमत म्हणून केल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलीस यंत्रणेचे अगणित मनुष्यतास वाया गेले. लक्षावधी प्रवाशांची गैरसोय झाली. हा सगळा अनुभव घेतल्यावर महाराष्ट्र पोलिसांनी झाले तेवढे पुरे झाले, असे समजून खोटे फोन करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी भूमिका घेतली आहे.
असे फोन करणाऱ्यांना सहज जामीन मिळतो आणि काहीही शिक्षा होत नाही. त्यामुळे पोलिसांनी असे कॉल्स करण्याचा गुन्हा हा अजामीनपात्र असावा आणि अपराध्याला काही वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा व्हावी, अशी दुरुस्ती भारतीय दंड संहितेमध्ये करण्याची शिफारस केली आहे.
‘सध्याच्या कायद्यानुसार, असे फसवे कॉल्स करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेचे कलम ५०५ (२) नुसार गुन्हा नोंदविला जातो, परंतु त्याला अगदी सहज जामीन मिळतो व त्याला क्वचितच शिक्षा होते. सध्याच्या कायद्यानुसार, या गुन्हेगाराला जास्तीत जास्त तीन वर्षांच्या तुरुंगवासाची व दंडाची शिक्षा होऊ शकते. विशिष्ट रेल्वेमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा फोन आम्हाला कोणी केल्यास, तो आम्ही गांभीर्याने घेऊन आमची सगळी यंत्रणा त्या कामाला लावतो. लक्षावधी प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते, कारण त्यांची झडती घेतली जाते. तो फोन खोटा होता, हे शेवटी स्पष्ट होते, तेव्हा गुन्हेगाराला अटक होते, परंतु अगदी सहजपणे त्याला जामीन मिळतो,’ असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
कलमांमध्ये दुरुस्तीचा विचार
एटीएसचे प्रमुख विवेक फणसाळकर म्हणाले की, ‘लोक जेव्हा खरी माहिती पोलिसांना देतात, त्या वेळी ते बक्षिसास पात्र असतात, परंतु जे मुद्दाम खोटे कॉल्स करतात, त्यांच्याशी कठोरपणे वागण्याची गरज आहे. हे कॉल्स थट्टा म्हणून समजता येणार नाहीत. कारण त्यामुळे संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लागते. अशा प्रकारांचा कठोरपणे बिमोड व्हावा, यासाठी संबंधित कलमांत दुरुस्तीचा विचार करीत आहोत.’